कोल्हापूर

कोल्‍हापूर : शिरोळ तालुक्यात ढगफुटीने २५०० हेक्टरवरील पिकांना फटका

निलेश पोतदार

जयसिंगपूर ; पुढारी वृत्तसेवा शिरोळ तालुक्यात शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर, शिरोळ, उदगाव, नांदणी, टाकवडे, उमळवाड, कोथळी, दानोळी, निमशिरगाव, चिंचवाड यासह अन्य भागात तब्बल 2500 हेक्टरमध्ये भाजीपाला, सोयाबीन, भुईमूग पिकाला मोठा  फटका बसला आहे. यात तब्बल पाच ते सहा कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. ऐन दिवाळीत शेतकऱ्याचे हे नुकसान झाले आहे.

शिरोळ तालुक्यात नेहमी महापुराने जोरदार फटका बसत असतो. अशातच प्रथमच अशा प्रकारे ढगफुटीसदृश पाऊस पडल्याने जयसिंगपूर शहराबरोबर अन्य गावांना पावसाचा तडाखा सहन करावा लागला आहे. पावसाची कमी आणि महापुराची हमी असलेल्या तालुक्याला प्रथमच पावसाने झोडपून काढले आहे. याचे परिणाम ओढे, नाले व कृष्णा, वारणा, पंचगंगा, दूधगंगा अशा चार नद्या पुन्हा एकदा भरून वाहू लागल्‍या आहेत. यात जयसिंगपूर शहरात अनेक घरात पाणी आल्याने ऐन दिवाळीत घरातून पाणी काढण्याची वेळ आली आहे.

नांदणी, उदगाव, चिंचवाड, उमळवाड, कोथळी, शिरोळ, अर्जुनवाड, शिरटी या भागातील शेतीला पावसाचा भीषण फटका बसल्याने कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, मिरची, कारली, दोडका, भेंडी यासह भाजीपाल्याला तसेच सोयाबीन, भुईमूग, उडीद, मूग आशा 2500  हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. आता या पावसाच्या पाण्यामुळे भाजीपाला कुजत आहे. दरम्‍यान आमदार राजेंद्र पाटील यांनी पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.  बाधित भागाचे पंचनामे करून शासनाकडून मदत येईल, असे तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांनी सांगितले.

हेही वाचा :  

SCROLL FOR NEXT