कोल्हापूर

कोल्हापूर : महागाईविरोधात राष्ट्रवादीचा एल्गार

मोहन कारंडे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : 'महागाईला जबाबदार असणार्‍या केंद्र सरकारचा धिक्कार असो', अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महागाई निषेधार्थ व ओबीसींच्या आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढला. मोर्चासमोर बोलताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी महागाईला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह घेण्यात येतील, असे सांगितले.

मोर्चासाठी सकाळपासून जिल्ह्यातून कार्यकर्ते दसरा चौकात जमत होते. कार्यकर्त्यांनी पांढर्‍या टोप्या घातल्या होत्या. बाराच्या सुमारास मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चामध्ये कार्यकर्त्यांनी बैलगाडी ओढत आणत पेट्रोल व डिझेल दरवाढीचा निषेध नोंदविला. महागाईच्या भस्मासुराची प्रतिकृती मोर्चामध्ये होती. दसरा चौकातून सुरू झालेला हा मोर्चा खानविलकर पेट्रोल पंप मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. कार्यकत्र्यांनी 'केंद्र सरकारचे धोरण, सर्वसामान्यांचे मरण', 'पेट्रोल, डिझेल, सीएनजी, गॅसची दरवाढ मागे घ्यावी', 'राष्ट्रवादी काँग्रेसा विजय असो', असे फलक हातामध्ये धरले होते. काही कार्यकर्त्यांनी 'गॅसची दरवाढ करणार्‍या केंद्र सरकारचा निषेध असो', 'ओबीसी आरक्षण मिळालेच पाहिजे', असे पोस्टर अंगात घातले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे हा परिसर दणाणून गेला.

मोर्चासमोर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह आ. राजेश पाटील, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, भैया माने, शहर अध्यक्ष आर. के. पोवार आदींची भाषणे झाली. मुश्रीफ म्हणाले, गेल्या काही महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तूंचे भाव सातत्याने वाढत असल्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट पूर्ण कोलमडले आहे. गेल्या दहा वर्षांत सोळा टक्के एवढी महागाई इतिहासात प्रथमच वाढली आहे. जीएसटीची रक्कम अद्याप महाराष्ट्राला केंद्राने दिली नसल्?याने त्याचा परिणाम राज्यातील विकासकामांवर होत आहे. त्यामुळे या सरकारला जाग आणण्यासाठी सामान्य जनेतेने रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे.

पवारांवरील आरोपामागे प्लॅन असावा
काही दिवसांपूर्वी शरद पवारांबद्दल चांगले बोलणारे राज ठाकरे आता काही संबंध नसताना आरोप करत आहेत. यामागे त्यांचा काही तरी प्लॅन असावा. मूळ प्रश्नापासून लक्ष विचलित करण्यासाठी जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. परंतु महाराष्ट्रातील सुज्ञ जनतेने अतिशय संयम दाखविला आहे. जनता रस्त्यावर उतरली तर काय होते? हे आपण शेजारच्या देशांमध्ये पहात आहे. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलचे दर अजून कमी करावेत.

आ. राजेश पाटील यांनी, वाढत्या महागाईच्या विरोधात तालुका स्तरावर भव्य मोर्चा काढून केंद्र सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न करावा, असे सांगितले. वाढत्या महागाईबद्दल जनता केंद्र सरकारला धडा शिकविल् याशिवाय राहणार नाही, असे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील म्हणाले. मोर्चात युवराज पाटील, अमरसिंह पाटील, मदन कारंडे, व्ही. बी. पाटील, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, नितीन जांभळे, राजेश लाटकर, आदिल फरास आदी सहभागी झाले होते. एका शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT