कोल्हापूर

कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्व निवडणुकांत भगवा फडकवा : खा. संजय राऊत

मोहन कारंडे

कागल; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद व भविष्यात येणार्‍या सर्व निवडणुकांमध्ये भगवा फडकवा. यापुढे भूमिगत राजकारण चालणार नाही. कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचा झंझावात निर्माण व्हायला पाहिजे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मभूमीतून संपूर्ण देशाला आणि महाराष्ट्राला संदेश द्या, असे आवाहन शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी दिल्लीत औरंगजेब बसले आहेत; मात्र मुंबईच्या रक्षणासाठी शिवसेना ताठ मानेने उभी आहे, असेही ते म्हणाले.

शिवसेना संपर्क अभियान अंतर्गत कागल येथील गैबी चौकात आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी खासदार संजय मंडलिक, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आमदार प्रकाश आबिटकर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, माजी आमदार संजय घाटगे, विजय देवणे, मुरलीधर जाधव उपस्थित होते.

संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रात आघाडीचे सरकार खेळीमेळीत आहे. कागल आणि कोल्हापूरच्या भूमीचा स्वाभिमान या मातीत रुजला आहे. या मातीतच आदर्श राजाचा जन्म झाला आहे. सामाजिक परिवर्तन कसे घडवावे, तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत विकास आणि राज्यकारभार कसा पोहोचवावा हे राजर्षी शाहू महाराजांनी दाखवून दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांनी राज्य कारभार करीत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या प्रेरणेतून राज्य पुढे चालले आहे; मात्र भाजपला अडीच वर्षे झोप येत नाही. सरकार सतत पडणार याची 'तारीख पे तारीख' दिली जात आहे. अडीच वर्षे बुद्धिबळाच्या पटावर अडीच घरे आम्ही पुढे गेलो आहोत. पट मांडून बसलो आहोत. आम्हाला खेळताही येते आणि खेळवताही येते, असे स्पष्ट करून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आमदार फुटणार म्हणून प्रयत्न करणार्‍या भाजपचे नशीब फुटले आहे. या राज्यात भाजपचे सरकार कधीही येणार नाही हे राज्य पुरोगामी विचाराचे आहे. शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेतून उभी राहिली आहे आणि त्याचे नेतृत्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करीत आणि पुढे नेत आहेत. कितीही आपटून घेतले तरी चपटे होईल मात्र तुमचे राज्य येणार नाही.

संजय पवार यांच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला उद्धव ठाकरे यांनी दिल्लीला पाठवण्याचा निर्णय घेतला हे केवळ शिवसेनेतच घडू शकते, असे सांगून राऊत म्हणाले, राहुल भट या काश्मिरी पंडिताला घरात घुसून गोळ्या घालण्यात आल्या. देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री नेमके आहेत कुठे? युक्रेनचे युद्ध मिटवायला जाणार्‍या पंतप्रधानांनी काश्मीरमध्ये सुरू असलेल्या पंडितांच्या हत्या थांबवण्याची गरज आहे, असा टोलाही राऊत यांनी हाणला.
अयोध्येतील बाबरी मशीद पाडल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मशीद पाडल्याचा गर्व असल्याचे सांगितले होते. औरंगजेबाशी आमचा काही संबंध नाही. आमचा संबंध छत्रपती शिवाजी महाराजांशी आहे. त्यांनी जन्म घेतला म्हणून इतिहास आहे; मात्र गुजरातमध्ये औरंगजेबाचा जन्म झाला. त्यांची वंशावळ आता आमच्यावर चालून येत आहे. मात्र यामध्ये मराठी माणूस आणि हिंदूंचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही. हिंदू आणि मराठी माणसाच्या मनगटात धमक आहे, असे कितीही औरंगजेब दिल्लीहून आले तर त्यांना गाढल्याशिवाय महाराष्ट्र राहणार नाही.
कोल्हापुरात भूमिगत राजकारण येथून पुढे चालणार नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील येणार्‍या सर्व निवडणुकीत भगवा फडकला पाहिजे. शिवसेनेला वेगळं केलं तर आम्हालाही वेगळे दाखवावे लागेल. आमच्याशी कुणी दगाबाजी करायची नाही, आम्ही दगा देणार नाही, असे राऊत यांनी स्पष्ट केले.

स्वागत हमीदवाडाचे संचालक ईगल प्रभावळकर यांनी केले. वीरेंद्र मंडलिक यांनी प्रास्ताविक केले. यावेळी खा. संजय मंडलिक, विजय देवणे संजय घाटगे यांची भाषणे झाली. खासदार संजय मंडलिक म्हणाले, राज्यामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराचे आघाडीचे सरकार आहे देशातील सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा उल्लेख होतोय याचा शिवसैनिकांना अभिमान आहे. शिवसेनेच्या मागे सामान्य माणूस उभा आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील भविष्यातील निवडणुकांमध्ये भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही.

कागलपर्यंत ईडी आलीय… गप्प बसू नका!
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पूर्वी मुंबई-परळमध्ये राहत होते. त्यावेळी ते शिवसैनिकच होते. मुंबईमध्ये राहणारे शिवसेनेमध्ये यायचे, असे खा. राऊत यांनी स्पष्ट केले. कागलपर्यंत ईडी आलीय. तोतरा… तोही आलेला आहे. गप्प बसू नका. भाजपची ही नामर्दानगी आहे. लढता येत नाही, समोरून सामना करता येत नाही म्हणून यंत्रणेचा गैरवापर केला जात आहे, असा आरोपही राऊत यांनी केला.

SCROLL FOR NEXT