कोल्हापूर

कोल्हापूर : कचरा घोटाळाप्रकरणी दोघांवर कारवाई

मोहन कारंडे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेतील कचरा घोटाळाप्रकरणी अखेर दोघांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. भाजपने त्यासाठी तीव्र आंदोलन छेडले होते. त्यानुसार नोडल ऑफिसर डॉ. विजय पाटील यांना तीन वर्षे एक वेतनवाढ का रोखू नये? अशी नोटीस बजावली आहे. तर ठोक मानधनावरील आरोग्य निरीक्षक निखिल पाडळकर याला कामावरून कमी केले. तसेच ठेकेदार कंपनीला रोज एक हजार याप्रमाणे 45 हजार रु. दंड केला आहे.

कोल्हापूर शहरातील कचरा गेली अनेक वर्षे विनाप्रक्रिया झूम प्रकल्पाजवळ पडून आहे. सुमारे साडेचार लाख टन कचर्‍याचा डोंगर साठला आहे. या कचर्‍यावर प्रक्रियेसाठी खासगी ठेकेदाराकडून बायोमायनिंग प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. याठिकाणी कचर्‍याचे वर्गीकरण करून शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जात आहे. परंतु, काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी या ठिकाणचा कचरा परिसरातील शेतात टाकल्याचे भाजपच्या माजी नगरसेवकांनी निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पंचनामा करण्यात आला होता.

भाजपच्या माजी नगरसेवकांनी याप्रकरणी कचरा घोटाळा झाल्याचा आरोप करून कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर डॉ. पाटील यांच्याकडून कार्यभार काढून घेण्यात आला होता. तसेच नुकतेच डॉ. पाटील व पाडळकर यांच्यावर कारवाई केली आहे.
दरम्यान, कचरा प्रकल्पाचा कार्यभार घेण्यास कोणीही अधिकारी तयार नाहीत. परिणामी, उपायुक्त रविकांत आडसूळ यांनी पुन्हा डॉ. पाटील यांच्याकडे कचरा प्रकल्पाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला
आहे.

SCROLL FOR NEXT