कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील संगमरवरी फरशी काढण्याच्या कामाला वेग आला आहे. पाच दिवसांत 30 टक्के काम पूर्ण झाले आहे. कामाची गती अशीच राहिली तर मेअखेर हे काम पूर्णत्वास जाईल. यानंतर जून अखेरपर्यंत फरशीखाली दडलेले मंदिराच्या सौंदर्याचे मूळ रूपात दर्शन होणार आहे.
मंदिरात लावण्यात आलेल्या संगमरवरी फरशीमुळे मंदिराच्या मूळ स्थापत्यशैलीला तर बाधा पोहोचलीच; पण मंदिरातील वातावरणावरही परिणाम होऊ लागला आहे. मंदिरातील अन्य भागांतील तापमान आणि संगमरवरी फरशी असलेल्या भागातील तापमानात 0.9 ते 1 अंशाचा फरक असल्याचे पाहणीत समोर आले होते. या सर्व पार्श्वभूमीवर देवस्थान समितीने मंदिरातील संगमरवरी फरशी काढण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या पाच दिवसांपासून फरशी काढण्याचे काम वेगाने सुरू आहे. अंबाबाई, महाकाली आणि महासरस्वती यांच्या प्रदक्षिणा मार्गावरील सर्व फरशी काढण्यात आली आहे. यासह महाकाली, महासरस्वती चौकातील सर्व भिंती आणि तळाची फरशी काढण्यात आली आहे. साक्षी गणपती समोरील प्रवेशद्वारावरील फरशी आज काढण्यात आल्यानंतर त्याचे सौंदर्य आणखी खुलले आहे.
कासव चौक, गणपती चौक, गरूड मंडप, मातृलिंग आदी विविध भागांसह संपूर्ण फरशी काढण्याच्या कामासाठी तीन महिन्यांची मुदत आहे. मात्र, मेअखेरपर्यंतच हे काम पूर्ण होईल, फरशी काढल्यानंतर मूळ स्थापत्य शिल्पांची विशिष्ट प्रकारे स्वच्छता केली जाईल, हे काम जूनअखेर पूर्ण होईल, यानंतर त्यांचे मूळ सौंदर्य आणखी खुलून दिसेल, असे देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी सांगितले.