कोल्हापूर

कुरूंदवाडमध्ये पाच मशिदींमध्ये ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना; सामाजिक एकोप्याचे दर्शन

Arun Patil

कुरूंदवाड ; जमीर पठाण : महाराष्ट्रात मशिदींच्या भोंग्यांवरून गेले चार महिने धार्मिक वातावरण चांगलेच तापले होते. राज्यात ठिकठिकाणी बंधने घालण्यात आली होती. मात्र, पुरोगामी कुरूंदवाड शहराने सामाजिक एकात्मता जोपासत मुस्लिम बांधवांनी मशिदींत गणपतीची प्रतिष्ठापना करून राज्यात-देशात प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश दिला आहे.

शहरातील विठ्ठल मंदिर, झारी मशिदीत एका भिंतीचे अंतर आहे. आजही या दोन्ही देवस्थानांत अजान-भजन-कीर्तन मंजुळ वाणीतून एकमेकांच्या भक्‍तिभावाने सुरू आहे. येथील कुडेखान बडेनालसाहेब मशीद, कारखाना मशीद, बैरागदार मशीद, शेळके मशीद, ढेपणपूर मशीद या पाच मशिदींत पारंपरिक पद्धतीने गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. सन 1982 साली शहरातील 5 मशिदींत पीर व गणपतीची एकत्रित प्रतिष्ठापना करण्याची परंपरा कै. गुलाब गरगरे, कै. दिलावर बारगीर, कै. वली पैलवान यांच्यासह आदी मंडळींनी सुरू केली आहे.

गणेशोत्सवाच्या काळात मशिदींत गणपतीची प्रतिष्ठापना करून मनोभावे मुस्लिम समाज गणपतीची पूजाअर्चा करत असतात. 36 वर्षांनंतर 2018 साली पुन्हा एकदा गणपती आणि मोहरम हे दोन्ही सण एकत्रित साजरे करण्याची पर्वणी आली होती. कुरूंदवाड शहर हे राष्ट्रीय एकात्मतेचे आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवणारे शहर आहे.

राज्यात अनेकवेळा जातीय दंगली उसळल्या; मात्र त्याचा शहरातील हिंदू-मुस्लिम ऐक्यावर कधीच परिणाम झाला नाही; तर कुरूंदवाडकरांनी शहरातील मशिदींतील गणपतींच्या प्रतिष्ठापनेचा आदर्श इतरांनीही घ्यावा, असा संदेश दिला होता. कुरूंदवाड या ऐतिहासिक नगरीत सर्वधर्मीयांची एकात्मतेची विण आजही अखंडितपणे घट्ट आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT