वाशी : चार राज्यांतील भाविकांचे श्रद्धास्थान वाशीचे ग्रामदैवत श्रीक्षेत्र बिरदेवास दिवाळीनिमित्त ओवाळणीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. दरम्यान, धनगर समाज बांधवांसह ग्रामस्थांच्या वतीने ‘ईडा पिडा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे’ असे साकडे बिरदेवास घालून दिवाळी पर्वाला वाशी येथे सुरुवात झाली. परंपरेनुसार रविवारी पहाटे पाच वाजता श्रींना महाअभिषेक घालून शेकडो भाविकांच्या उपस्थितीत महाकाकड आरती करण्यात झाली.
यावेळी संजय पुजारी, सुभाना रानगे यांच्या हस्ते श्रींची आकर्षक पूजा बांधण्यात आली होती. त्यानंतर रानगे, पुजारी, काटकर, बनकर, हजारे, लांडगे व ग्रामस्थ, मानकर्यांच्या उपस्थितीत बिरदेवासह गावातील सर्व दैवतांना ओवाळण्यात आले.
यावेळी ‘ईडा पिडा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे’ असे साकडे घालण्यात आले. यावेळी ‘बिरदेवाच्या नावानं चांगभलं’चा गजर करत भंडार्याची मुक्त उधळण व आकर्षक आतषबाजी करण्यात आली. दरम्यान, मंदिराचा परिसर पणत्यांच्या लख्ख प्रकाशाने उजाळून गेला होता. या कार्यक्रमास धुळशीद पुजारी, भागोजी रानगे, विशाल पुजारी, रंगराव रानगे, संतोष रानगे, संतोष पुजारी, सनी पाटील यांच्यासह धनगर समाज बांधव, ग्रामस्थ, मानकरी उपस्थित होते.