एकनाथ नाईक
कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात (सीपीआर) अत्याधुनिक गो टॉप 128 स्लाईस सीटीस्कॅन उपकरण दाखल झाले आहे. हे उपकरण केवळ एका मिनिटात सीटीस्कॅन पूर्ण करून रुग्णांना आजाराचे अचूक निदान देणार आहे. हे अत्याधुनिक वैद्यकीय उपकरण तब्बल 13 कोटींचे आहे. याचा फायदा कोल्हापूर तसेच सीमाभागातील रुग्णांना होणार आहे.
सध्या सीपीआर येथे 128 स्लाईसचे एक सीटीस्कॅन उपकरण आहे. त्यावर स्कॅन करण्यासाठी एका रुग्णाला 8 ते 10 मिनिटांचा वेळ लागतो. दिवस-रात्र हे उपकरण सुरू आहे. अतिगंभीर रुग्ण आला तर अन्य रुग्णांना वेटिंगला थांबविले जाते. दररोज 60 ते 70 सीटीस्कॅन होत असले तरी उर्वरित 40 ते 50 रुग्णांना वेटिंगमध्ये थांबावे लागत आहे. नवीन मशिनमुळे दररोज येणार्या 120 ते 125 रुग्णांचे स्कॅन तत्काळ होणार असून त्वरित उपचारांचा मार्ग मोकळा झाला आहे.
सीटीस्कॅन मशिन अपघातग्रस्त, हृदयरोगी, कर्करोगग्रस्त तसेच इतर गंभीर आजारांच्या निदानासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. आधुनिक तंत्रज्ञामुळे तत्काळ आणि अचूक निदान होऊन त्वरित उपचार सुरू करण्यासाठी डॉक्टरांना याची मदत होणार आहे. खासगी डायग्नोस्टिक सेंटरमधील सीटी स्कॅनचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचा आहे. सीपीआरमध्ये ही सेवा सुरू झाल्याने गरीब व मध्यमवर्गीय रुग्णांना याचा फायदा होणार आहे.
सीपीआर येथे सीटीस्कॅनसाठी रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विशेष लक्ष देऊन अत्याधुनिक सीटीस्कॅन उपलब्ध करून दिले आहे. रुग्णालयात या उपकरणाची जोडणी सुरू असून येत्या 15 दिवसांत ते रुग्णसेवेत येणार आहे. कोल्हापूरसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच कर्नाटक येथील सीमेलगतच्या गावातील रुग्णांना या सुविधेचा मोठा फायदा होणार आहे.
रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्यानंतर रुग्णांचे निदान समजावे यासाठी डॉक्टर सीटीस्कॅन करण्याचा सल्ला देतात. पण सध्या उपलब्ध असणार्या मशिनवर मर्यादा येत होत्या. त्यामुळे गंभीर रुग्णांना प्राधान्याने स्कॅनसाठी घेतले जाते. पण काही रुग्ण सेटिंग लावून स्कॅनसाठी प्रयत्न करत होते. आता या अत्याधुनिक मशिनमुळे ‘नो वेटिंग, नो सेटिंग’ राहणार आहे.