कसबा सांगाव : कलंदर सनदी
डोळ्याच्या अपंगत्वाचे भांडवल न करता हलाखीच्या परिस्थितीला जिद्दीने सामोरे जाणाऱ्या विनायकच्या जिद्दीच्या प्रवासाला अडथळ्यांची शर्यत थांबण्याचे नाव घेत नाही. हलाखीच्या परिस्थितीला धैर्याने सामोरे जाणारा विनायक मात्र प्रशासनाच्या अडथळ्था पुढे अडखळताना आत्मदहनाचा इशारा देत आहे.
मौजे सांगाव (ता.कागल) येथील विनायक अशोक मगदूम (वय २६) याला जन्मापासूनच डोळ्यांच्या अपंगत्वाला सामोरे जावे लागत आहे. बालपणीच वडिलांचे छत्र हरवलेल्याने घरात आलेल्या अठराविश्व दारिद्र्यावर जिद्दीच्या जोरावर आईचे कष्ट आणि बहिणीच्या सहकार्याने शिक्षणाची वाट धरलेल्या मळ्यात राहणाऱ्या विनायक मगदूमने शालेय, महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून जळगावमध्ये स्पर्धापरीक्षेची तयारी चालू ठेवली आहे. नुकत्याच झालेल्या आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी शासन निर्णयानुसार लेखनिक घेऊन पोहोचलेल्या विनायकला प्रशासनाने थांबवून स्वतःचा लेखनिक दिला मात्र त्याला इंग्रजी वाचन करण्यास अडचण भासत होती. त्यामुळे विनायकला प्रश्नच समजले नाहीत. वेळ ही पूर्ण मिळाला नाही. याची तक्रार त्याने संबंधित परीक्षा अधिकाऱ्याला केली मात्र त्याच्या तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचे त्याचे म्हणणे आहे.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे तक्रार करण्यासाठी गेला असता तात्काळ त्यांनी चौकशी समिती नेमून अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या. चौकशी समितीने विनायकला बोलून त्याची बाजू ऐकून घेऊन त्याला सहानुभूती दिली. मात्र अहवाल सादर करत असताना चौकशीचे सोपस्कार पूर्ण करणारा अहवाल सादर केल्याचे विनायकचे म्हणणे आहे. त्यामुळे नैराश्या आलेल्या विनायक आत्मदहनाचा इशारा दिला आहे. जिल्ह्यातील अपंग संस्था, अपंग मित्रांनी याप्रश्नी लक्ष घालून विनायकला न्याय द्यावा अशी मागणी होत आहे.
दुसरा स्वप्नील लोणकर ?
स्पर्धा परीक्षेतील गोंधळामुळे यापूर्वीच पूणे येथील स्वप्नील लोणकरने आत्महत्येचा मार्ग पत्करला होता. विनायकही त्याच दिशेने जातोय की अशी भीती त्याच्या जवळच्यांना आहे. त्यामुळे प्रशासन दुसरा स्वप्नील लोणकर होण्याची वाट पाहते आहे काय? अशा संतप्त प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत.
मला न्याय न मिळाल्यास…..
अपंग म्हणून जन्माला आल्याचे कसलेही दुःख मला नाही. मी माझ्या कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर यशाचा मार्ग शोधत आहे. मला प्रशासनात जाऊन माझ्यासारख्या अपंग बांधवांचा आधार बनायच आहे. मात्र प्रशासनाची यंत्रणाच माझ्या प्रामाणिक प्रयत्नाला अडथळा ठरत आहे. मला न्याय न मिळाल्यास मी आत्मदहन करणार आहे.
– विनायक मगदूम
हेही वाचा