Wadange Garbage Issues
वडणगे: वडणगे (ता.करवीर) येथे गेल्या दहा वर्षांपासून भेडसावणाऱ्या कचऱ्याच्या समस्येवर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. वडणगे गावचे रहिवासी राजेंद्र शंकर पोवार आणि दिलीप विष्णू प्रभावळे यांनी ॲड. रविराज बिरजे, ॲड.योगेश सावंत यांच्या मार्फत ही याचिका दाखल केली असून, याचिकेत ग्रामीण विकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. सोमवारी (ता.२३) या याचिकेवर सुनावणी होणार आहे.
या याचिकेतून याचिकाकर्त्यांनी गावातील कचऱ्या संदर्भात गंभीर बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत.35 हजारहून अधिक लोकसंख्या असलेल्या वडणगे गावातील प्रमुख रस्ते, चौक व गल्ल्यांमध्ये रोज ओला व सुका कचरा याचबरोबर प्लास्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणात अस्ताव्यस्त टाकला जातो. वडणगे गावच्या स्थानिक प्रशासनाकडे या कचऱ्याच्या व्यवस्थापनाची कोणतीच ठोस यंत्रणा नाही. कचऱ्याचे हे ढीग कमी करण्यासाठी प्लास्टिक मिश्रित हा कचरा पेटवला जातो. यातून निर्माण होणाऱ्या विषारी धुरामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असल्याचे याचिकेत म्हटले आहे.
तसेच पोवार पाणंद मुख्य रस्त्यावर दहा पेक्षा अधिक हॉटेल्स व खानावळींमधून दररोज मोठ्या प्रमाणावर ओला कचरा निर्माण होतो.परंतु या कचऱ्याच्या वेगळ्या संकलन व विल्हेवाटीसाठी प्रशासनाकडे कोणतीच यंत्रणा नाही. हॉटेल वेस्टच्या या कचऱ्यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून त्यांचाही धोका आहे. वाढत्या कचऱ्याच्या समस्येमुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांवरही अतिरिक्त ताण पडत असून त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
वडणगे ग्रामपंचायत प्रशासनाकडे कचरा डम्पिंगसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध नसल्याने, कचऱ्याचे योग्य वर्गीकरण होत नाही. तसेच कचऱ्याची वैधानिक विल्हेवाट लावण्यासाठी घनकचरा प्रकल्प नाही. स्थानिक प्रशासनाकडून हा कचरा गावाबाहेरील झाडवाट कुरण मंडळ येथील पूरप्रवण क्षेत्रात मोठ्या खड्ड्यात माती टाकून मुजवला जातो. यामुळे पंचगंगा नदीसह येथील शेती क्षेत्राला या कचऱ्यामुळे धोका निर्माण झाला असल्याच्या गंभीर प्रकाराकडे याचिकेतून न्यायालयाचे लक्ष वेधले आहे. सोमवारी होणाऱ्या या याचिकेच्या सुनावणीकडे लक्ष लागले असून, न्यायालय यावर कोणते निर्देश देणार याबाबत उत्सुकता आहे.
दै.पुढारीने वडणगे येथील कचऱ्याच्या समस्येवर सातत्याने आवाज उठवला आहे. त्यानंतर नागरिकांनी कचऱ्याच्या प्रश्नावर प्रशासनाला तक्रार अर्ज, निवेदन देऊनही प्रशासनाने कचऱ्याच्या या गंभीर प्रश्नाकडे आजवर दुर्लक्ष केले.मात्र येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पोवार व दिलीप प्रभावळे यांनी या समस्येवर उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.
वडणगेच्या स्थानिक प्रशासनाकडे कचरा विल्हेवाटीची कोणतीही ठोस यंत्रणा नाही. त्यामुळे गावात साचलेल्या कचऱ्याचा उठाव न होता. तो पेटवला जातो. याचबरोबर पूर बाधित व शेतीजवळ खड्डा काढून कचरा मुजवला जातो. कचऱ्याच्या समस्येवर हे उपाय नाहीत.- राजेंद्र शंकर पोवार, याचिकाकर्ते