

कोल्हापूर : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये होणारा हापूस आंब्याच्या सौद्याचा मुहूर्त यंदा प्रथमच रद्द झाला. कोकणातून होणारी देवगड व रत्नागिरी हापूसची आवक अत्यंत कमी झाल्याने गुरुवारी समितीमध्ये आंब्याचा सौदा निघाला नाही. गतवर्षीच्या तुलनेत यंदा केवळ 10 टक्केच आवक झाल्याने समितीमधील फळ विभागात गुढीपाडव्याला होणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या उलाढालीवर परिणाम झाला आहे.
कोल्हापूर बाजार समितीमध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रतिवर्षी हापूस आंब्याचे सौदे निघून येथून पुढे खऱ्या अर्थाने आंबा सिझनला सुरुवात होते. पाडव्यानंतर कोकणातून आंब्याची आवक नियमितपणे सुरू राहते. मात्र, यंदा कोकणातील आंबा बागायतदारांना हवामान बदलाचा फटका बसला असून, उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे समितीमध्ये आंबा आवक तुरळक प्रमाणात सुरू आहे. गुरुवारी गुढीपाडव्याला केवळ 815 पेटी आवक झाली. गतवर्षी 7 हजार पेट्यांची आवक झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत केवळ 10 टक्केच आंबा आल्याने यंदा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर समितीमध्ये आंब्याचे सौदे रद्द करण्यात आले.