कोल्हापूर: महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. हक्काची मते दुसर्या प्रभागात गेल्याने इच्छुक उमेदवारांची झोप उडाली आहे. मतदार यादीतील त्रुटी, नाव तपासणीतील निष्काळजीपणा आणि मोठ्या प्रमाणावर मतदारांचे प्रभागांतर झाल्याने उमेदवार आणि पक्षांची गणिते पूर्णतः विस्कळीत झाली आहेत. एकाच पत्त्यावर शेकडो नावे, अपूर्ण पत्ते, मृत व्यक्तींची नावे कायम राहणे तसेच हजारो मतांची दुसर्या प्रभागात नोंद झाल्यामुळे गोंधळाचे सावट निर्माण झाले आहे.
निवडणूक प्रक्रियेतील मतदार यादी हा सर्वात संवेदनशील आणि निर्णायक टप्पा मानला जातो. मात्र, या याद्यांतील विसंगतीमुळे संपूर्ण प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हक्काच्या मतांचा गठ्ठा दुसर्या प्रभागात गेल्याने अनेक इच्छुक संभाव्य उमेदवारांच्या राजकीय भवितव्यावर थेट गदा आली आहे.
राजकीय कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार आता ‘डोळ्यात तेल घालून’ मतदार यादीचे बारकाईने निरीक्षण करत आहेत. चुकीचे प्रभाग, दुमडलेली नावे आणि अनधिकृत समावेश शोधण्यासाठी ‘ऑपरेशन मतदार यादी’ सुरू झाले आहे.
हरकतींचा पाऊस आणि प्रशासनाची धांदल
मुदत मर्यादित असल्याने मतदार यादीवरील हरकती नोंदवण्यासाठी नागरिक आणि कार्यकर्त्यांची धावपळ सुरू आहे. आतापर्यंत 143 हरकती प्राप्त झाल्या असून पुढील चार दिवसांत हा आकडा आणखी वाढला जाईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. प्रशासनाने अतिरिक्त कर्मचारी नेमून ही प्रक्रिया ‘मिशन मोड’मध्ये राबवण्यास सुरुवात केली आहे.
चार सदस्यीय प्रभागात वाढते राजकीय आव्हान
पहिल्यांदाच लागू झालेल्या चार सदस्यीय प्रभाग प्रणालीमुळे प्रत्येक प्रभागाची व्याप्ती मोठी झाली आहे. पूर्वी एकसदस्यीय पद्धतीत 1500 ते 2000 मते विजयासाठी पुरेशी असत. आता मात्र 6 ते 8 हजार मतांचा आकडा गाठणे अनिवार्य ठरणार आहे. त्यातच वास्तविक मतदार आपल्या प्रभागात आहेत की नाही, हा सर्वात मोठा प्रश्न बनला आहे.