उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गजापुरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली Pudhari News Network
कोल्हापूर

Vishalgad Encroachment | विशाळगड हिंसाचारग्रस्त कुटुंबीयांचे सर्व नुकसान सरकार भरून देणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

गजापुरातील नुकसानग्रस्त भागाची उपमुख्यमंत्री पवारांकडून पाहणी

पुढारी वृत्तसेवा

विशाळगड : विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेला रविवारी (दि१४) हिंसक वळण लागले. यामध्ये अतिक्रमणाचा काडीचाही संबंध नसलेल्या गजापुरातील मुस्लिमवाडीला आंदोलन कर्त्यांना टार्गेट करून घरांची, वाहनांची, प्रापंचिक साहित्यांची तोडफोड, जाळपोळ असा प्रकार घडला होता. नुकसानग्रस्तांच्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या वस्तीला गुरुवारी सायंकाळी भेट दिली.

नुकसानग्रस्त प्रत्येक कुटुंबाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. सरकार नुकसानग्रस्त कुटुंबाच्या पाठीशी ठाम आहे. सर्वोतोपरी मदत सरकारकडून केली जाईल, हल्ला करणाऱ्यावर सरकार कारवाई करेल, सरकारकडून प्रत्येक नुकसानग्रस्त कुटुंबांना ५० हजाराची मदत दिली आहे. ही प्राथमिक स्वरूपात आहे. पंचनाम्यातील २ कोटी ८५ लाखांची रक्कम नुकसानग्रस्तांना सरकारकडून लवकरच दिली जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथील नागरिकांशी संवाद साधताना दिली. 

गेल्या काही वर्षांपासून किल्ले विशाळगडावरील अतिक्रमणे हटवण्याची मागणी शिवप्रेमींतून होत होती. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही शिवप्रेमींना विशाळगड येथे येण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर जमावाने केलेल्या दगडफेक, जाळपोळ केली. यामध्ये अनेक घरे, वाहनांचे नुकसान झालं. यानंतर खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी रोष व्यक्त करत सरकारला धारेवर धरलं. त्यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारचा प्रतिनिधी म्हणून घटनास्थळी भेट दिली होती. पहिल्यांदाच सरकारमधून उपमुख्यमंत्री अजित पवार घटनास्थळी दाखल झाले.

यावेळी येथील नुकसानग्रस्त इमाम प्रभुळकर यांनी रविवारी झालेला घटनेचा प्रसंग अजित पवार यांच्यासमोर मांडला. अजित पवार यांनी ही घटना दुदैवी असल्याचे मत व्यक्त केले. सरकारकडून जेवढी मदत देता येईल त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे नागरिकांशी संवाद साधताना सांगितले. रस्त्यालगत असणाऱ्या रेश्मा सिकंदर प्रभुळकर यांच्या दुकानाचे व घराचे जमावाने मोठ्या प्रमाणात नुकसान करून घर जाळण्याचा प्रयत्न केला. यात त्यांचे मोठे नुकसान झाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही विशेष बाब म्हणून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना त्यांना नुकसान भरपाई त्वरित मिळावी यासाठी हालचाली कराव्यात अशा सूचना केल्या.

दरम्यान विशाळगडावर अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू असून काही घरांचे अतिक्रमण काढण्यात आलेले नाही, त्यांचेही अतिक्रमण सप्टेंबरनंतर काढले जाईल असेही अजित पवार म्हणाले, यावेळी विशाळगडावरून अजित पवार यांच्या भेटीला आलेल्या महिलांनी आमची घरे, दुकाने अतिक्रमणात काढली आहेत.  आमचा संसार उघड्यावर पडला असून राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आम्हाला जागा उपलब्ध करून द्याव्यात, आमचे पुनर्वसन करावे अशी मागणी शाहीन अबूबकर मुजावर, लक्ष्मी भाऊ डाफळे या महिलांनी अजित पवार यांच्याकडे केली. सरकार याचा विचार करेल असे आश्वासन पवार यांनी महिलांना दिले. गजापुरातील नागरिकांनी सरकारने योग्य मदत करावी आणि ज्यांनी हल्ला केला त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. शिवाय या परिसरातील संचारबंदी हटवण्याची मागणीही केली आहे. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार रामलिंग चव्हाण यांच्यासह शासकीय अधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT