Traffic Disruption Vishalgad
विशाळगड : पन्हाळा-पावनखिंड पदभ्रमंतीसाठी आलेल्या पर्यटकांना घेऊन जाण्यासाठी आलेली एस.टी. महामंडळाची (एमएच २४, केइयू १८३७) बस आज केंबुर्णेवाडी घाट रस्त्याशेजारील चरीमध्ये अडकल्याने विशाळगडाकडे जाणारी वाहतूक सुमारे चार तास पूर्णपणे ठप्प झाली आहे. ही घटना दुपारी तीनच्या सुमारास घडली. सांगली आगाराची बस असल्याचे समजते. या घटनेमुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
मिळालेल्या माहितीनुसार, पावनखिंड येथे पन्हाळा-पावनखिंड पदभ्रमंतीतून सांगली येथील काही पर्यटक येथील रणभूमीला अभिवादन करण्यासाठी आले आहेत. या ट्रेकर्सना नेण्यासाठी सांगली आगाराची बस दुपारी आली. चालकाने बस वळवण्यासाठी पावनखिंड सोडून भाततळीमार्गे विशाळगड रस्त्याने बस नेली. मात्र, रस्ता चुकल्याचे लक्षात येताच, केंबुर्णेवाडी घाटाजवळील एका वळणावर चालकाने बस मागे घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पाठीमागील चर आणि खड्ड्यांचा अंदाज न आल्याने बसची मागील चाके रस्त्याशेजारील चरीत रुतली आणि बस रस्त्याच्या मधोमध आडवी झाली.
या अपघातामुळे विशाळगडाकडे तसेच मलकापूरच्या दिशेने जाणारी वाहतूक जवळपास चार तास थांबली आहे. बसचा पाठीमागचा भाग पूर्णपणे जमिनीला टेकला होता. परिसरात दाट धुके असल्याने समोरची वाहनेही स्पष्ट दिसत नव्हती, ज्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली होती. विशाळगडाच्या दिशेने जाणारी वाहने केंबुर्णेवाडी येथून आंब्याच्या दिशेने मलकापूरला वळवण्यात आली असली तरी, विशाळगडाकडे जाणारी वाहतूक पूर्णतः थांबली आहे.
या अनपेक्षित घटनेमुळे अनेक प्रवासी अडकून पडले असून, त्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. बस बाहेर काढण्यासाठी आणि वाहतूक पूर्ववत करण्यासाठी अद्याप हालचाली नसून बस जागेवरच आहे.