विशाळगड : शाहूवाडी तालुक्यातील म्हाळसवडे धनगरवाड्यावरील ग्रामस्थांनी शासन व लोकप्रतिनिधीकडून मुलभूत प्राथमिक सुविधा मिळत नसल्यांच्या निषेधार्थ विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या निर्णय घेतला आहे. निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायत पणुद्रे-म्हाळसवडे अंतर्गत म्हाळसवडे धनगरवाडा येतो. साडेतीनशे लोकवस्ती, तरुण वर्ग कामानिमित्त बाहेरगावी वास्तव्यास आहेत. वाड्यावर वयस्कर व्यक्तींचाच राबता. येथील वीज, पाणी, रस्ते या मूलभूत समस्या कायम आहेत. त्याचा उदरनिर्वाह जंगली लाकूड, डोंगरचा रानमेवा, कडीपत्ता, तमालपत्र विकून करतात. शेळ्या-मेंढ्या, म्हैस-गाय जनावरांचे पालन करत तुटपुंज्या शेतीवर संसार चालवितात. निवडणुका जवळ आल्या की, लोकप्रतिनिधी येथे येऊन आमच्याच घोंगड्यावर बसून आश्वासनांचा पाऊस पाडतात. मात्र ऐन समस्येवेळी इकडे कोण फिरकतच नाहीत.
वाड्यावरील गेल्या दहावर्षांमध्ये कोणतेच काम पूर्णत्वास गेलेले नाही. दहा वर्षांपासून पेयजल योजना अपूर्ण आहे. लोकांचे पाण्यासाठी अतोनात हाल होत आहेत. याबाबत प्रशासनास वेळोवेळी लेखी तक्रार देऊनही दुर्लक्ष केले जात आहे. रस्त्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. पावसाळ्यात वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड राग व नाराजी आहे. या निषेर्धात विधानसभा निवडणूकींवर जाहीर बहिष्कार टाकत आहे. निवेदनावर केशव कस्तुरे, सचिन येडगे, अविनाश चौगुले, बापू कस्तुरे, संजय कस्तुरे, विनायक कस्तुरे, संतोष बोडके आदींच्या सह्या आहेत.
पाणी, रस्ते, वीज आदी प्रश्न नागरिकांना भेडसावत आहेत. निवडणूका आल्या की, आश्वासनांची खैरात होते. मात्र विकास नाही. पाण्याचा प्रश्न बिकट असताना लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष आहे. आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मतदान न करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी एकजुटीने घेतला आहे.केशव कस्तुरे, ग्रामस्थ, म्हाळसवडे धनगरवाडा