ज्येष्ठ उद्योगपती बाबाभाई वसा यांचे निधन File photo
कोल्हापूर

बाबाभाई वसा यांचे निधन; कोल्हापूरचे डिझेल इंजिन उत्पादन जगभरात नेणारे उद्योजक

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूरच्या उद्योग विश्वाला आपल्या उत्पादन गुणवत्तेच्या जोरावर सातासमुद्रापार पोहोचवणारे तसेच डिझेल इंजिन उत्पादनात जागतिक पातळीवर नावाजलेल्या रॉकेट इंजिनियरिंग कार्पोरेशनचे कार्यकारी संचालक गजेंद्रभाई ठाकरसी उर्फ बाबाभाई वसा यांचे बुधवारी (दि.16) वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले. कौशल्य, स्केल, वेग ही त्रिसूत्री अंगीकारून एखाद्या उद्योजक कमालीचा यशस्वी होवू शकतो. आपली उत्पादने सातासमुद्रापार पोहचवू शकतो, याचा आदर्श वस्तूपाठ सांगावयाचा झाल्यास डिझेल इंजिन उत्पादनात जागतिक पातळीवर स्थिरावलले कोल्हापूरचे रॉकेट इंजिनियरिंग कार्पोरेशनचे कार्यकारी संचालक श्रीमान गजेंद्रभाई ठाकरसी तथा बाबाभाई वसा यांचा देता येईल.

गुजरात प्रांतातील सौराष्ट्रामधील जामनगर येथील मुळचे श्रीमान ठाकरसी वसा गुळाच्या व्यापारासाठी कोल्हापूरात आले. गुळ व्यवसायात थोडीशी स्थिरता आल्यावर ते कायमचेच कोल्हापूरात स्थायिक झाले. याच कुटुंबात १४ एप्रिल १९३९ साली जन्मलेले बाबाभाई हे आपले वडील बंधू हेमुभाई, यांच्या साथीने प्रारंभी गूळ व्यवसायात आणि काही काळाने उद्योग व्यवसायात उतरले १९६२ साली दोन्ही बंधूजी शिवाजी उद्यमनगरात डिझेल इंजिनच्या उत्पादनास सुरुवात केली. पण औद्योगिक मंदी, व्यावसायिक स्पर्धा, उत्पादनाच्या मागणीतील तफावत यामुळे त्यांना सुरुवातीच्या काही वर्षात प्रचंड त्रास सहन करावा लागला. संकटांना सामोरे जावून त्यावर मात करण्याच्या अंगभूत गुणामुळे बाबाभाईनी आपल्या उत्पादनात आधुनिक तंत्रज्ञान, वापरून काळानुसार बदल करून नव्याने उभारी घेतली. दर्जा, कार्यक्षमता व गुणवत्तेवर भर देताना त्यांनी नवनवीन संशोधनाची कास धरली. स्थानिक बाजारपेठे बरोबराच आंतरराष्ट्रीय बाजारात झेप घेण्यासाठी त्यांनी निर्यात विभागाशी संपर्क साधला आणि हेच पाऊल त्यांच्या जीवनाला कलाटणी देवून गेले. त्यांच्या एकूण उत्पादनांपैकी ४५ टक्के डिझेल इंजिनांची निर्यात होवू लागली. प्रारंभी व्होल्टास कंपनीशी विक्री व्यावसायविषयक करार केल्यानंतर पुढे बॉटलीबॉय, किर्लोस्कर यांच्याशी पुरवठा करार केल्यामुळे रॉकेटच्या उत्पादनांना मागणी वाढू लागली.

शिवाजी उद्यमनगर, वाय. पी. पवार नगर, शिरोली औद्योगिक वसाहत अशा प्रगतीदायक प्रवासात त्यांनी कॉमेट या नावाचे कमी वजनाचे सहज हलवता येणारे पोर्टेबल डिझेल इंजिन निर्माण करून क्रांती घडविली. वातानुकुलीत डिझेल इंजिन, इलेक्ट्रिक मोनोब्लॉक मशीन टूल्स, रेडियल ड्रिलींग मशीन आदी उत्पादनांच्या निर्मितीवर भर दिला. प्रखर जिद्द, चिकाटी, सातत्य व नवनवीन प्रयोग करण्याची उर्मी अंगी बाणवल्यास यश पायाशी लोळण घालते हे बाबाभाईंनी सिद्ध करून दाखवले. ‘मंदी’ हा शब्द त्यांच्या शब्दकोषातच नव्हता . उद्योग विश्वातील प्रशंसनीय कार्याची नोंद घेऊन महाराष्ट्र सहकाराची लघुउद्योग विभागात उत्कृष्ट निर्यातीकरिता तीन पारितोषिक, सर्वोत्कृष्ट लघुउद्योग पुरस्कार, पारखे आदी पुरस्कारांनी त्यांना आजवर सन्मानित केले . कोल्हापूर इंजिनिअरींग असोसिएशनचे उपाध्यक्ष व अध्यक्षपदाची धुरा सांभाळून त्यांनी उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रसंगी आंदोलनाची भूमिका बजावली. सी. आय. आय. च्या दक्षिण विभागाचे प्रमुख, इंडियन डिझेल इंजिन उत्पादक संघटना (मुंबई) चे अध्यक्षपद ते भूषवित आहेत.

ज्या समाजाने आपणास मोठे केले त्या समाजाचे आपणही देणे लागतो या भावनेने बाबाभाईंनी आजपर्यंत भुकंपग्रस्त, दुष्काळग्रस्त, विविध युद्धाच्या काळात, तसेच कर्करोग, हृदयरोग रुग्णांना यथाशक्ती आर्थिक मदत केली असून दातृत्वाचे हे कार्य केले. अर्थशास्त्राचे पदवीधर असलेले बाबाभाई हे मितभाषी असले तरी जगाकडे पाहण्याची त्यांची विशाल दृष्टी होती . आपल्या यशामध्ये हसतमुखराय, जयराजभाई, जोगेश, किरण, पारस, भव्यराज या कुटुंबातील सदस्यांसह कामगार वर्गाचे मोठे योगदान असल्याचे ते विनयाने सांगत असत. अशा कोल्हापूर उद्योग विश्वाला मोठी गती दिलेल्या बाबाभाई वसा यांचे बुधवारी वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने कोल्हापूर उद्योग विश्वात न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.. तर अनेक औद्योगिक क्षेत्रातील घडामोडीत त्यांचा मोठा सहभाग असायचा, सामाजिक बांधिलकी जपणारा म्हणूनही त्यांना ओळखले जायचे. अशा बाबाभाई वसांच्या निधनाने कोल्हापूर उद्योग विश्वात शोककळा पसरली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT