Kolhapur Rain Update
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यात आज (२५ एप्रिल) पहाटेपासून अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. कोल्हापूर शहरासह हातकणंगले, करवीर, पन्हाळा, शिरोळ आणि इतर तालुक्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. या अचानक बदललेल्या हवामानामुळे शेतकरीवर्गाची चिंता वाढली असून, उभी पिकं, भाजीपाला यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आज पहाटे साडेसहाच्या सुमारास ढगाळ वातावरण होतं आणि काही वेळातच वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. काही भागांत गारपीटही झाल्याचे वृत्त आहे. अवकाळी पावसामुळे ड्रेनेज, नाले, गटारी तूंबून रस्त्यांवर पाणी साचले असून, सकाळी कामावर निघालेल्या नागरिकांना वाहतुकीत अडथळ्यांचा सामना करावा लागला.
पावसामुळे विजेची देखील अनियमितता दिसून आली. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आगामी २४ तासांत कोल्हापूर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामानातील या बदलाचे मुख्य कारण बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा असल्याचे सांगितले जात आहे. शेतकरी वर्गात मात्र या पावसामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक शेतांमध्ये पिकं काढणीसाठी तयार होती, तर काहींनी आधीच काढणी केली होती. तसेच काही ठिकाणी लागवडीची तयारी सुरू होती.
या पावसामुळे त्या सगळ्या कामांवर परिणाम झाला असून, पिकाचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून शेतकरी आणि नागरिकांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.