

पुणे: पुणे शहर आणि परिसरात सध्या उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. त्यामुळे विजेच्या मागणीतही वाढ झाली आहे. या वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सध्या पुणे परिमंडलात 3400 ते 3500 मेगावॅट एवढी वीज देण्यात येत आहे.
पुणे शहर आणि जिल्ह्यात मागील दोन ते तीन वर्षांपासून एप्रिल आणि मे या उन्हाळ्याच्या महिन्यांत वाढत्या उन्हाच्या तडाख्यामुळे विजेच्या मागणीत हमखास वाढ होत आहे. सध्या उन्हाचा तडाखा मागील दोन ते तीन वर्षांच्या तुलनेत नक्कीच जास्त आहे.
एरवी पुणे शहर आणि परिसरात उन्हाळ्याच्या दिवसांत शहराचे तापमान 40 अंशांच्या आसपास असते. यावर्षी एप्रिल महिन्यातच तापमानाचा पारा 42 ते 43 अंशांच्या पुढे गेला आहे. उन्हाच्या या वाढत्या तडाख्यामुळे नागरिक पंखे, वातानुकूलित यंत्रणांचा वापर वाढवू लागले आहेत. त्यामुळे विजेच्या मागणीत चांगलीच वाढ झाली आहे.
महावितरणच्या पुणे परिमंडलात पुणे, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागातील मुळशी, चाकण, राजगुरुनगर हे भाग समाविष्ट आहेत. या भागांत सर्वसाधारणपणे (उन्हाळ्याचे दिवस वगळता) 3100 ते 3200 ते जास्तीत जास्त 3300 मेगावॅट एवढ्याच विजेची मागणी असते. यावर्षी ही मागणी 3400 ते 3500 मेगावॅटवर गेली आहे. अजून मे महिना येणार आहे. त्यामुळे या मागणीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, महावितरण वीज कंपनीस महाजनको, एनटीपीसी (केंद्र शासनाची वीज उत्पादन करणारी कंपनी), एनटीपीसीएल, हायड्रो (जलविद्युत प्रकल्प), पवनचक्क्या, सहवीजनिर्मिती प्रकल्प यांसह काही खासगी कंपन्यांमार्फत वीजपुरवठा करण्यात येत आहे.