Two children from the same family in Sambhapur tragically died just a few hours apart
टोप : पुढारी वृत्तसेवा
संभापूर ता.हातकणंगले येथील एकाच कुटुंबातील दोन बालकांचा अवघ्या काही तासांच्या अंतराने दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेने कुटुंब सुन्न झाले आहे. तर ग्रामस्थांमधून या घटनेबाबत हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेत वरद सागर पोवार (वय ६) विराज सागर पोवार (वय ४) या दोन भावंडांचा दुर्दैवी अंत झाला आहे. या बाबत पेठ वडगाव पोलीस ठाण्याकडील विराज पोवार याच्या मृत्यू बाबतची दाखल वर्दी तसेच स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संभापूर येथील पोवार मळ्यात राहत असलेल्या पोवार कुटुंबीयांमधील सागर पोवार यांच्या वरद व विराज या अनुक्रमे ४ व ६ वर्षे वयाच्या दोन मुलांना पोटदुखी व उलटीचा त्रास होऊ लागल्याने मंगळवारी पेठ वडगाव येथील खास रुग्णालयात उपचार सुरू होते.
त्या नंतर गुरुवारी पुन्हा त्रास होऊ लागल्याने त्यांना पुन्हा दवाखान्यात दाखल केले. तथापी तेथे विराजची तब्बेत खालावत जाऊन उपचारादरम्यान गुरुवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. पारगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात मिळालेल्या एका मुलाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले गेले. तोच दुसरा मुलगा वरद याची देखील तब्बेत खालावू लागल्याने त्याला गुरुवारी रात्री कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
परंतु त्याची मृत्यूशी सुरू असणारी झुंज अखेर आज शुक्रवारी सकाळी संपली व त्याचा आज शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. अवघ्या काही तासांच्या अंतराने दोन भावंडे मृत्यमुखी पडल्याने नातेवाईकांनी केलेल्या आक्रोशाने उपस्थितांना हेलावून टाकले. दरम्यान या दोन्ही मुलांची आई सौ.पूजा सागर पोवार यांना ही कोल्हापूर येथे उपचारासाठी दाखल केले होते. त्यांची प्रकृती स्थिर आहे. या दुर्दैवी घटनेबद्दल ग्रामस्थ व नागरीकांमधून हळहळ व्यक्त होत आहे.
हसत खेळत वाढणारी दोन बालके इतक्या कमी कालावधीत मृत्युमुखी पडल्याने एकच खळबळ उडाली आहे अंतिम शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याने या बालकांच्या दुर्दैवी मृत्यूचे कारण स्पष्ट होण्यासाठी आता अंतिम शवविच्छेदन अहवालाची वाट पहावी लागणार आहे.