प्रयाग चिखली : कोल्हापूर- रत्नागिरी महामार्गावरील वाहतुकीची प्रचंड गैरसोय होत आहे. रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली करण्यात येणारी मलमपट्टी कूचकामी ठरत असून प्रवाशांच्या जीवाशी अक्षरशः खेळ चालू आहे.गेल्या अनेक वर्षापासून रस्ता न झाल्यामुळे तसेच महापुराच्या पाण्यामुळे संपूर्ण रस्ताच खचला आहे. रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम चालू आहे. परंतु या रस्त्याबाबत आभाळच फाटले त्याला ठिगळ लावून काय उपयोग? अशी स्थिती निर्माण झाली आहे.
पुराच्या वेळी वाहून गेलेल्या साईड पट्ट्यांवर अत्यंत चुकीच्या पद्धतीने मोठे दगड- गोटे टाकले आहेत. ते अद्याप तसेच पडून आहेत. या साईट पट्ट्यांवर वाहन चालवू शकत नाही. उगवलेल्या गवतामुळे साईट पट्ट्या झाकून गेलेल्या आहेत. अशी स्थिती आहे. वाहनांच्या वर्दळीच्या तुलनेत रस्ता अत्यंत अरुंद आहे. शिवाय साईड पट्ट्याही अस्वच्छ आणि अडथळ्याच्या बनल्या आहेत. पुरामुळे संपूर्ण रस्ताच खचला आहे त्यामुळे गतिमान वाहनधारकांचा ताबा सुटतो आणि हकनाक दुचाकी स्वाराना जीवास मुकावे लागल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. ठिकठिकाणी गावांच्या फाट्याजवळ अपघाताला निमंत्रण देणारी स्थिती आहे.