टिक्केवाडी 
कोल्हापूर

कोल्हापूर : टिक्केवाडीकरांची गुळं प्रथा आदर्शवत, अख्खं गाव घरदार सोडून गेलं शेतशिवारात राहायला

सोनाली जाधव

गारगोटी : रविराज वि. पाटील

शंभर एक वर्षांपासून सुरू असलेली गुळं काढण्याची प्रथा टिक्केवाडी ग्रामस्थांनी आजही मोठ्या भक्‍तिभावाने सुरू ठेवली असून दर तीन वर्षांनी साजरी होणार्‍या या प्रथेमुळे ग्रामस्थांमध्ये नवचैतन्याचे, एकोप्याचे आणि भक्‍तिभावाचे बीज पेरून जात आहे. एकत्र कुटुंबाचा विसर पडलेल्या मोबाईल आणि भौतिक सुखाच्या सापळ्यात अडकलेल्या आजच्या डिजिटल पिढीसाठी आदर्शवत आहे.

टिक्केवाडी हे साडेतीन हजार वस्तीचं डोंगरात वसलेलं गाव. भुजाईदेवी हे या गावचे ग्रामदैवत. देवीवर नितांत श्रद्धा असणारे.. इथले ग्रामस्थ दर तीन वर्षाला 'गुळं' काढतात… 'गुळं' काढणे म्हणजे घरामध्ये कुणीही राहायचं नाही…सर्वांनी टीव्ही, मोबाईलसारख्या भौतिक सुखांना बाजूला ठेऊन निसर्गाच्या सान्‍निध्यात राहायचं व देवी कौल देईल तेव्हाच घरी यायचं. त्यामुळे या गावात शुकशुकाट पसरला आहे. घरांना कुलूप नसलं तरी चोरीचा प्रकार घडत नसल्याचे ग्रामस्थ सांगतात. माघवारीनंतर येणार्‍या पौर्णिमेपासून ही गुळं काढली जातात. टिक्केवाडीकर देवीचे नाव मुखात ठेवत मुक्‍त जीवनशैलीचा आनंद लुटत आहेत. राहण्यासाठी शेतशिवारात जी पालं उभारली आहेत त्याला ही मंडळी 'गुळं' म्हणतात. गावात शुकशुकाट असला तरी इथली शाळा मात्र सुरू आहे. इथल्या प्रत्येक घरामध्ये पदवीधर झालेली एक तरी व्यक्‍ती आढळते; पण या प्रथेला ही सुशिक्षित मंडळी अंधश्रद्धा समजत नाहीत.

गुळं काढलेल्या ठिकाणी भेट दिली असता दिवसभर शिणलेले, भागलेले जीव सुख, दु:ख विसरून रात्री शाहिरी, ओव्या, गीते, भजन, कीर्तनामध्ये रंगून जाऊन आनंद लुटताना दिसत असून येथील वातावरण अगदी प्रसन्‍न आणि प्रफ्फुलित झाले आहे. गेले आठ दिवस हा दिनक्रम सुरू आहे.

पूर्वापार चालत आलेल्या या प्रथेमागे ग्रामस्थांच्या भावना दडलेल्या आहेत. भुजाईदेवी गावकर्‍यांचे संरक्षण करते. ही इथल्या लोकांची श्रद्धा आहे. देवीला कौल लावून गावकरी 'गुळं' काढतात आणि पुन्हा कौल दिला की आपापल्या घरी परतात. पूर्वी या प्रथेदरम्यान लोक गावापासून दूर जंगलात असलेल्या बोकाचावाडा, बसुदेवाचा वाडा, हंड्याचा वाडा या धनगर वस्तीवर राहायला जात होते; पण अलीकडे ही प्रथा शेतशिवारात पाळत आहेत. शिवारात 25 ते 30 कुटुंबांसाठी एकच पालं उभारले आहे. संपूर्ण पालातील लोक रात्री एकाच पंगतीला बसून चुलीवरच्या सहभोजनाचा गुण्यागोविंदाने आनंद घेतात. पै-पाहुणे जेवणाचा गारवा घेऊन सहभागी होऊ लागले आहेत. त्यामुळे टिक्केवाडी ग्रामस्थांमध्ये एकत्र कुटुंब पद्धतीचे व एकात्मतेचे दर्शन घडून येते.

आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये एकत्र कुटुंब ही संकल्पना मावळत चालली आहे. मात्र, या निमित्ताने कुटुंब, भावकी एकत्र येऊन सर्वच आठवणींना उजाळा देतात. लहान मुलेही खेळाचा आनंद लुटतात. यामुळे एकजुटीचीही भावना, एकोपा वाढतो.
– सौ. अर्चना प्रवीण पाटील

भुजाईदेवी हे धनगर समाजाचे श्रद्धास्थान आहे. धनगर ज्या प्रमाणे आपला ठावठिकाणा बदलातात तशीच ही प्रथा असून पूर्वी साथीच्या रोगाची साथ होती. त्यामुळे संसर्ग जास्त पसरू नये म्हणून ग्रामस्थ शेतात राहायला जात होते. त्यातूनच ही गुळं काढण्याची प्रथा सुरू झाली.
– नेताजी गुरव
पोलिस पाटील

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT