Three people including an assistant constable of Ispurli police station suspended for taking money for Ashadhi Yatra
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा आषाढ महिन्यातील यात्रेसाठी व्यावसायिकांसह अन्य घटकांकडून पैसे उकळल्याचा ठपका ठेवत इस्पुर्ली पोलीस ठाण्यातील सहायक फौजदारासह तीन कर्मचाऱ्यांवर मंगळवारी सकाळी निलंबनाची कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी कारवाईचा बडगा उगारला. सहाय्यक पोलीस फौजदारासह तिघांवर निलंबनाची कारवाई झाल्याने पोलीस वर्तुळात खळबळ माजली आहे.
निलंबन झालेल्यात सहायक पोलीस फौजदार अजितकुमार देसाई, हवालदार कृष्णा यादव आणि कॉन्स्टेबल पंकज बारड यांचा समावेश आहे. या तिघांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक धीरज कुमार गुप्ता यांनी करवीरचे पोलीस उपाधीक्षक सुजित क्षीरसागर यांना दिले आहेत.
आषाढ महिन्यातील यात्रेसाठी इस्पुरली पोलीस ठाण्यातील काही पोलिसांनी व्यावसायिकासह काही सेवानिवृत्त अधिकाऱ्याकडून पैसे उकळले होते. त्यात एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा समावेश होता. संबंधित निवृत्त अधिकाऱ्यांकडून ऑनलाइन पैसे उकळण्यात आले होते. त्याचा स्क्रीन शॉर्ट सोशल मीडियावरून व्हायरल झाल्याने या घटनेची पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी गंभीर दखल घेतली होती. पोलीस उपाधीक्षक क्षीरसागर यांच्यामार्फत या घटनेची दोन दिवस चौकशी सुरू होती. पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी सोमवारी या घटनेची स्वतः खातर जमा केली. चौकशी अंती तिघेही दोषी आढळल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
बदलीसाठी पोलीस कर्मचाऱ्यांकडून खंडणी उकळणाऱ्या पोलीस मुख्यालयांतर्गत आस्थापना शाखेतील लिपिक संतोष पानकर आणि वाहतूक नियंत्रण शाखेतील महिला कॉन्स्टेबल धनश्री जगताप यांच्यावरील कारवाईनंतर पोलीस अधीक्षकांनी इस्पुर्ली पोलीस ठाण्यातील साहेब फौजदारासह तिघांना एकाच वेळी निलंबित केल्याने पोलिस यंत्रणेत खळबळ माजली आहे.