कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या न्यायालयीन कामकाजाला सोमवार, दि. 18 पासून प्रारंभ होत असल्याने प्रशासकीयस्तरावर जय्यत तयारी सुरू आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील उच्च न्यायालयातील सर्वच खटल्यांचे कागदोपत्री रेकॉर्ड सोमवारी (दि. 11) सकाळपासून कोल्हापुरात आणण्यास प्रारंभ झाला आहे. मुंबई पोलिसांच्या बंदोबस्तात दोन ट्रकमधून सुमारे अडीच हजारांवर फायलींचे गठ्ठे सुरक्षितपणे आणण्यात आले.
फर्स्ट अपिल, सेकंड अपिल, अटकपूर्व जामीन अर्ज, रेग्युलर जामीन अर्ज, रिट याचिका, एफआयआर रद्द करण्याच्या याचिकांसह जनहित याचिका आदी विविध खटल्यांतील रेकॉर्डचा त्यामध्ये समावेश आहे. दोन, तीन अथवा त्यापेक्षा अधिक संख्येने ट्रकमधून सलग 10 ते 12 दिवस मुंबई उच्च न्यायालयातून सर्किट बेंचसाठी रेकॉर्ड आणण्यात येणार आहे. नूतनीकरणाचे काम पूर्ण होऊन इमारत सर्किट बेंच प्रशासकीय व्यवस्थापनाच्या ताब्यात आल्यानंतर युद्धपातळीवर संपूर्ण रेकॉर्डचे अद्ययावत फायलिंग करण्यात येईल, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले.
कोल्हापूर सर्किट बेंच दैनंदिन न्यायालयीन कामकाजासाठी मुंबई उच्च न्यायालयातील वरिष्ठ अधिकार्यांसह दोनशेवर कर्मचार्यांचा स्टाफ कोल्हापुरात दाखल होणार आहे. तत्पूर्वी सोमवारी उपनिबंधक संदीप एम. भिडे, विभाग अधिकारी सचिन कांबळे, सहायक विभाग अधिकारी संतोष भंगाळे यांच्यासह 10 लिपिक व 10 शिपाई असा 24 जणांचा स्टाफ सोमवारी सकाळी दाखल झाला.
लिपिकामध्ये राहुल घाटगे, अरुण क्षीरसागर, यशोधन अनावरकर, अनंत बी. ढेरे, शुभम व्ही. तळेकर, प्रमोद एस. कोळी, सिद्धेश जी. फोंडके, अजिंक्य आर. यादव, गणेश शंकर निराटे, पृथ्वीराज खोत यांचा समावेश आहे. उच्च न्यायालयाने 10 ऑगस्टच्या आदेशानुसार पहिल्या टप्प्यात 24 कर्मचार्यांची कोल्हापूर सर्किट बेंचसाठी बदली केली असून सोमवारी (दि. 11) सकाळी 10 वाजता हजर राहण्याचे त्यांना आदेश देण्यात आले होते. त्यानुसार सर्व कर्मचारी हजर झाले आहेत. संबंधित अधिकारी, कर्मचार्यांच्या निवासाची तूर्त व्यवस्था जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे, असेही सांगण्यात आले.