शिरढोण/बिरु व्हसपटे :
शिरढोण व टाकवडे (ता.शिरोळ) परिसरात पंचगंगा नदीच्या पुराच्या पाण्यामुळे हजारो हेक्टरातील शेती पिके पाण्याखाली गेली आहेत. यामध्ये भुईमूग, सोयाबीन, ऊस, भात, भाजीपाला तसेच अन्य पिकांचा समावेश आहे. काही शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेल्या पिकांना फटका बसून मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतकरी नुकसानभरपाईसाठी पंचनाम्याच्या प्रतीक्षेत आहेत.
गेल्या चार दिवसांपासून शिरढोणसह टाकवडे येथील शेतीसह काही वसाहतीला पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. पुराचा वेढा अद्याप तसाच असून तासातासाने पुराच्या पाणी पातळीत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे अनेक कुटुंबे स्थलांतरित होत आहेत. दरम्यान शेतकऱ्यांचे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसत आहे. शिरढोण येथील कुरुंदवाड रस्ता भागातील यमगर मळी, पाणदारे मळी भागात असलेल्या शेती पिकात सुमारे दहा ते पंधरा फूट पाणी साचलेले आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या घरासह शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान स्थलांतरित लोकांचे पंचनाम्याचे काम सुरू असून, पाणी पूर परिस्थिती कमी झाल्यानंतर शेतीचे पंचनामे करण्यात येथील असे तलाठी रवी कांबळे यांनी सांगितले.
शिरढोण येथील शेतकरी महावीर भूपाल माणगावे यांचे दहा एकरातील हातातोंडाला आलेले भुईमूग, सोयाबीन आणि भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या शेतामध्ये जवळपास दहा फूट पुराचे पाणी साचले आहे. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान टाकवडे भागातील शेतकऱ्यांचे पुराच्या पाण्यामुळे अतोनात नुकसान झाले असून, मोठ्या प्रमाणात पिके पाण्याखाली गेली आहेत.
शिरढोण येथे कुरुंदवाड रस्त्याकडून गावाच्या दिशेने येणाऱ्या पुराच्या पाण्याला तासाला इंचा इंचाने वाढ होत असल्याने अद्यापही पूरपरिस्थिती जैसे थे आहे. त्यामुळे अजूनही स्थलांतरित होण्यासाठी लोक लगभग करत आहेत. मात्र संथगतीने पाणी वाढ होत असल्याने थोडा फार दिलासा मिळाला आहे. पावसाने दिलेली उघडीप व अलमट्टीतून होणारा विसर्ग याचा परिणाम असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.