Kolhapur Flood : मलकापूर-शाहूवाडीला जोडणारा शिरगाव-सांबू पूल पाण्याखाली, वाहतूक बंद
विशाळगड, पुढारी वृत्तसेवा : Kolhapur Kadvi River Flood : गेल्या काही दिवसांपासून कडवी धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाच्या सरी कोसळत असल्याने कडवी धरण १०० टक्के भरले आहे. कडवी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आल्याने कडवी नदीला महापूर आला आहे. कडवी नदीवरील शिरगाव-सांबू दरम्यानचा पूल आज पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली आहे.
या पुलाला समांतर असणारा बंधारा यापूर्वीच पाण्याखाली गेला होता. या मोठ्या पुलावरून वाहतूक सुरळीत होती. मलकापूर, शाहूवाडीला जोडणारा हा जवळचा मार्ग आहे. तो पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. या पुलावर सध्या तीन फूट पाणी आहे. शिरगाव येथील युवकांनी डेअरीत संकलित केलेले दूध संघाकडे पाठवणारी मोहीम या पुलावरून राबवून सुरक्षितस्थळी दुधाचे कॅन पोहचविले.
कडवी धरण १०० टक्के भरले आहे. कडवी मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत असलेने जलाशय साठ्यामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. धरणातून कडवी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात करण्यात आल्याने नदीला महापूर आला आहे. धरणाच्या सांडव्यावरून २४२० क्यूसेस तर विद्युत गृहातून २२० क्यूसेस असा एकूण २६४० क्यूसेस पाण्याचा विसर्ग कडवी नदीपात्रात होत आहे. तरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा धरण प्रशासनाने दिला.

