कोल्हापूर

इचलकरंजीतील पशुवैद्यकीय दवाखान्याची दयनीय अवस्था, अत्याधुनिक उपकरणे वापराविना पडून

अनुराधा कोरवी

इचलकरंजी; संदीप जगताप: इचलकरंजी शहरातील शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्याची दयनीय अवस्था बनली आहे. दवाखान्यामध्ये अत्याधुनिक उपकरणे असूनही जागेअभावी वापराविना पडून आहेत. तसेच जनावरांवर होणारी शस्त्रक्रिया अनेक वर्षांपासून बंद आहे.

पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी आपुर्‍या जागेच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाने गावभाग पोलिस ठाण्यासमोरील गट क्र. १४४ मधील ३० गुंठे जागेची मागणी ऑक्टोबर २०२१ रोजी अप्पर तहसील कार्यालयाकडे केली होती. अधिकार्‍यांनीही संबंधीत जागेबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या जागेबाबत निर्णय झाल्यास इचलकरंजी शहरात सुसज्ज पशुवैद्यकीय रुग्णालय पाहायला मिळणार आहे.

शहरातील एकमेव सरकारी पशुवैद्यकीय दवाखाना २००४ पासून इचलकरंजी नगरपालिकेच्या मालकीच्या असलेल्या गॅरेज विभागातील एका गळ्यामध्ये सुरू आहे. हा दवाखाना श्रेणी एकचा असून १८ वर्षांहून अधिक काळ भाडेतत्वाच्या जागेमध्ये आहे. इचलकरंजी नगरपालिकेच्या क्षेत्रातील सि.स.नं. १०२४० येथील एकूण ३०५६.२ चौ.मी. जागा शासनाच्या नावावर आहे. त्यातील ३० गुंठे जागा आयुक्त पशुसंवर्धन महाराष्ट्र पुणे यांच्या नावावर करण्याची मागणी करण्यात आली आहे.

पशुसंवर्धन विभागाकडे प्रस्तावित प्रशासकीय पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय इमारत बांधण्यासाठी १ कोटी रुपये निधी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. संभाव्य दवाखान्यामध्ये ब्लड अ‍ॅनालायझर, बायोकेमिकल अ‍ॅनालायझर, सोनोग्राफी युनिट, एक्सरे मशिन आदी उपकरणांसह अत्याधुनिक यंत्र सामग्रीने सुसज्ज असलेल्या पशुवैद्यकीय दवाखाना असणार आहे. त्यामुळे तालुक्यातील पशुपालकांच्या पशुवर उपलब्ध उपकरणाचा वापर करून रोगनिदान व उपचारापासून वंचित राहावे लागणार नाही.

शहर परिसरातील ८५६२ जनावरांची परवड

इचलकरंजी शहर व परिसरात गायी, म्हैस, शेळ्या अशा ८५६२ जनावरांची नोंद आहे. शहरालगत असलेल्या गावामध्ये सरकारी पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. मात्र, तिथे डॉक्टर नसल्याने बंद आहेत. परिणामी पशू पालकांना खासगी दवाखान्यांकडे धाव घ्यावी लागते. त्यामुळे त्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. भविष्यात इचलकरंजी शहरामध्ये सुसज्य पशुवैद्यकीय दवाखाना झाल्यास शहर परिसरातील पशुपालकाना त्यांचा लाभ होणार आहे.

हेही वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT