कोल्हापूर

मुदाळतिट्टा : प्रशासकीय समितीने स्वीकारला बाळूमामा देवालयाचा कार्यभार, शिवराज नायकवडेंसह दोघेजण पाहणार कामकाज

अनुराधा कोरवी

मुदाळतिट्टा; पुढारी वृत्तसेवा : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री. क्षेत्र आदमापूर ( ता. भुदरगड ) येथील सदगुरु बाळूमामा देवालय या मंदिराची ट्रस्टी अखेर धर्मादाय सहआयुक्त शशिकांत हेर्लेकर यांनी सोमवारी बरखास्त केली असून तीन सदस्यीय समितीची प्रसारक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शिवराज नाईकवाडे यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून सदस्यपदी धर्मादाय निरीक्षक एम. के. नाईक आणि धर्मादाय निरीक्षक सत्यनारायण शेणॉय यांची सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. मंगळवारी (दि. २५) रोजी या समितीने आपला कार्यभार स्वीकारला आहे.

सद्गुरु बाळूमामा देवस्थान समितीच्या अधिकार पदाच्या कारणावरून गेल्या अनेक दिवस समिती सदस्यांमध्ये वाद सुरू होता. या वादाचे पर्यावसन कोल्हापूर येथे झाले होते. यानंतर आपणच देवालयाची अधिकृत ट्रस्टी असे दोन्हीकडून दावे करण्यात आले होते. या दाव्यापूर्वी गेल्या अनेक वर्ष या ठिकाणी देवस्थानवर समितीवर आर्थिक भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. प्रवीण पाटील ( बिद्री ), रवींद्र पाटील ( फये ) हनुमंत पाटील ( आकुर्डे ) यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर विश्वस्त मंडळावर पुराव्यानिशी आरोप करण्यात आले होते. न्यायालयाने सर्व पुरावे तपासून विश्वस्त मंडळ बरखास्त केले. जमीन खरेदीचा वाद हे यावेळी उपस्थित करण्यात आला होता. धर्मादाय सहयुक्त आणि धर्मादाय सह आयुक्त बरखास्तीचा बडगा उभारला आहे. विद्यमान ट्रस्टमधील ११ जणांना बरखास्त केल्या असून उर्वरित दोन जणांना कायम ठेवले आहे. मात्र, कामकाजात भाग घेण्यास मनाई करण्यात आली आहे.

मयत ट्रस्टिंगच्या जागी नव्याने नेमण्यात आलेल्या आठ जणांच्या संदर्भात कोणताही निर्णय देण्यात आला नसून अद्याप सदरचा विषय धर्मादाय कार्यालयात प्रलंबित ठेवण्यात आला आहे. ज्यावेळी धर्मादाय कार्यालय त्यांना मंजुरी देईल त्यावेळी ते कामकाजात भाग घेऊ शकणार आहेत. तोपर्यंत कोणालाही कामकाजात हातक्षेप करता येणार नाही.

या तीन समितीचे सदस्यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर आदमापूर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दत्तात्रय पाटील, दिनकरराव कांबळे, यशवंतराव पाटील, संभाजी पाटील, दिलीप पाटील, इंद्रजीत खर्डेकर, नामदेव पाटील, एस. पी. पाटील, संदीप कांबळे ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांनी बाळूमामाच्या मंदिर विकासासाठी व भक्तांच्या सेवेसाठी आपण सहकार्य करू अशी भूमिका यावेळी व्यक्त केली.

आजपासून या तीन समितीचे सदस्य प्रत्येक विभागणीहाय कामकाजाचा आढावा घेण्याची सुरुवात केली आहे. आढावा घेतल्यानंतर यामध्ये असणाऱ्या त्रुटी आपण समोर ठेवून त्यामध्ये सुधारणा करून कामकाज केले जाईल, आदमापूर ग्रामस्थांच्या सहकार्याने इथून पुढे कामकाज पाहिले जाणार आहे. सोमवारी नियुक्तीचा आदेश प्राप्त झाल्यानंतर मंदिराची सर्व ऑफिस कुलूप बंद होती. त्यामुळे आपण ते सील करण्याचे काम केले. आज पुन्हा माहिती घेऊन खुली करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे व बाळूमामाच्या भक्तांना सर्व सेवा सुविधा चांगल्या पद्धतीने कशा मिळतील यासाठी कार्यरत राहणार असल्याचे प्रशासकीय अध्यक्ष शिवराज नायकवडे यांनी यावेळी सांगितले.

अकरा जणांवर बरखास्तीची कारवाई

एकूण २१ सदस्य असणाऱ्या या ट्रस्टीपैकी धैर्यशीलराजे भोसले (अध्यक्ष), राजाराम मगदूम (मयत), रावसाहेब कोणकेरी( सचिव), गोंविद पाटील, शिवाजी मोरे, पुंडलिक होसमणी, लक्ष्मण होडगे, तमन्ना मासरेडी, भिकाजी शिंणगारे, रामांना मुरेगूद्री, सिद्धाप्पा सुरानवर, आप्पासाहेब पुजारी या अकरा जणांवर बरखास्तीची कारवाई करण्यात आली आहे. तर सरपंच ग्रामपंचायत आदमापूर, पोलीस पाटील आदमापूर यांना कायम ठेवण्यात आले असुन कामकाजात भाग घेण्यास मनाई करण्यात आली आहे. नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या ट्रस्टीला धर्मादाय आयुक्ताने अद्याप मंजुरी दिली नसल्याने त्यांनाही कामगार कामकाजात भाग घेता येणार नाही. असा एकंदर निकाल झाला असल्याचे चित्र स्पष्ट आहे. आता पुढे काय? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा :  

SCROLL FOR NEXT