सरूड : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या १२ कार्यकर्त्यांची सन २०२३-२४ गळीत हंगामात ऊसदर आंदोलनातून दाखल झालेल्या गुन्ह्यातून शिराळा प्रथमवर्ग न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. आधीच्या गळीत हंगामात तुटलेल्या ऊसाचे शेतकऱ्यांना अधिकचे प्रतिटन ५० रु. मिळावेत व २०२४ मधील गळीतासाठी तुटणाऱ्या ऊसाची पहिली उचल ३५०० रु. मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने पश्चिम महाराष्ट्रात आंदोलन करण्यात आले होते. यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी परिसरातील कारखान्याचे गाळप बंद पाडले होते.
यामध्ये शाहूवाडी, शिराळा तालुक्यातील कारखान्यांना आंदोलनाची झळ बसली होती. यावेळी पोलीस प्रशासनाने स्वाभिमानीच्या संबंधित कार्यकर्त्यांविरोधात सरकारी कामात अडथळा तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचा गुन्हा दाखल केला होता. या ऊसदर आंदोलनामुळे झालेल्या तडजोडीतून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ७५ रु प्रमाणे ४.५० कोटी रुपये मिळाले. शिराळा न्यायालयाच्या न्याय दंडाधिकाऱ्यांनी नुकताच निकाल जाहीर केला.
न्यायालयात आंदोलकांच्यावतीने ॲडव्होकेट ए. एम. मुलाणी यांनी बाजू मांडली. स्वाभिमानीचे शाहूवाडी तालुक्यातील कार्यकर्ते सुरेश म्हाऊटकर (बांबवडे), भैय्या थोरात (वडगाव), गुरुनाथ शिंदे (सोनवडे), राजू पाटील (रेठरे) तसेच शिराळा तालुक्यातील मानसिंग पाटील, शिवलिंग शेटे, दादासो पाटील (सागांव), प्रकाश पाटील (कांदे), देवेंद्र धस (बिळाशी), रवी पाटील (पाडळी), प्रदीप पाटील (कंणदूर), राम पाटील (शिराळा) या सर्व कार्यकर्त्यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.