कासारवाडी, टोप-कासारवाडी फाट्यावर स्थानिक नागरिक व शालेय विद्यार्थ्यांनी खड्ड्यातील पाण्यात कागदी बोट सोडून सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध करत अनोख्या पद्धतीने आंदोलन केले.
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून कासारवाडी फाटयामार्गे जोतिबा, पन्हाळ्याला जाण्यास राज्य मार्ग आहे. येथे सुमारे १०० ते २०० मीटर अंतरावर आजूबाजूचे नाल्याचे पाणी आल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. तीर्थक्षेत्र जोतिबा व ऐतिहासिक पन्हाळा गडाकडे जाण्यासाठी हा मार्ग असल्याने पर्यटकांची मोठी गर्दी असते. शिवाय जवळच औद्योगिक वसाहत असल्याने कामगार व शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक सुरू असते.
रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटारी नसल्याने पाणी रस्त्यावर येते. येथे अनेक खड्डे पडल्याने नेमका वाहन चालकाला अंदाज येत नाही. यामुळे अनेक छोटे-मोठे अपघात होतात. काहींच्या गाड्या बंद पडतात तर विद्यार्थ्यांना यातून चालत जाणे जोखमीचे झाले आहे. खड्डा चुकवण्यासाठी चालक उलट दिशेने गाडी चालवतात.या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थी व स्थानिक नागरिकांनी पाण्यात कागदी बोट सोडत अनोखे आंदोलन केले.यावेळी संतोष शिंदे, कृष्णात माने, मोहन जोंधळे, नामदेव घाटगे, सतीश घाटगे, रोहित मुळीक यांच्याासह नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.
रस्त्यावरील खड्डयांबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने कार्यवाही सुरू करावी, अन्यथा जन आंदोलन करण्यात येईल.
अच्युत खोत, सरपंच, कासारवाडी
हेही वाचा