कोल्हापूर

पन्हाळगडाच्या अपरिचित इतिहासाने विद्यार्थी भारावले…

Shambhuraj Pachindre

पन्हाळगडावर कोणकोणत्या राजांनी राज्य केले? गडाच्या स्थापत्यावर कोणकोणत्या राजवटीतील शैलींचा प्रभाव आहे? गडावरील जलव्यवस्थापन कसे आहे? तटा-बुरजात असणार्‍या शिलालेख, विविध प्राणी-पक्ष्यांची शिल्पे, नक्षीदार खांब यांची वैशिष्ट्ये काय? शिवछत्रपतींनी पन्हाळगडाच्या मजबुतीसाठी कोणकोणत्या उपाय योजना केल्या? या व अशा इत्थंभूत आणि अपरिचित माहितीने विद्यार्थी व इतिहासप्रेमी भारावले.

निमित्त होतं दैनिक 'पुढारी' संचलित प्रयोग सोशल फाऊंडेशन व संजीवन ग्रुप ऑफ स्कूल्स, पन्हाळा यांच्या वतीने जागतिक वारसा सप्ताहांतर्गत झालेल्या 'हेरिटेज वॉक'चे. शनिवारी ऐतिहासिक पन्हाळगडावर हा उपक्रम राबविण्यात आला. यात पुरातत्त्वशास्त्र अभ्यासक सचिन पाटील यांनी मार्गदर्शन केले.

सह्याद्री पर्वतरांगेची निर्मिती, पन्हाळगडाचे भौगोलिक महत्त्व, निसर्ग संपन्नता, जैवविविधता, कोल्हापूरचा परदेशांशी असणारा व्यापार यासह सुमारे दोन हजार वर्षांच्या इतिहासावर प्रकाशझोत टाकला. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरेही दिली.

उपक्रमास संजीवन पब्लिक स्कूलचे अध्यक्ष पी. आर. भोसले, सीईओ प्राची भोसले, मोडी लिपी अभ्यासक वसंत सिंघन यांच्यासह संजीवन विद्यालय, विद्यानिकेतन, छत्रपती शिवाजी ज्युनिअर कॉलेज, डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालय, पेरिड-मलकापूरचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लाख पिढ्यांचा वसा वैभवी पुढच्या पिढीस बहाल करू….

'सह्याद्री वाचवू-वाचवू द़ृढ ऐसा निर्धार करू, लाख पिढ्यांचा वसा
वैभवी पुढच्या पिढीस बहाल करू,' हे सह्यगिरी म्हणजेच सह्याद्री पर्वताविषयीचे कवण शिवशाहीर डॉ. पुरुषोत्तम ऊर्फ राजू राऊत यांनी सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या शिवपसायदानाने उपक्रमाची सांगता झाली.

पाहा व्हिडिओ : महाराष्ट्राला हसवणाऱ्या अभिनेत्री निर्मीती सावंत यासाठी रडतात

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT