इचलकरंजी, पुढारी वृत्तसेवा : सातत्याने येणार्या महापुराच्या पार्श्वभूमीवर पूर नियंत्रणासाठी नदी पात्रातील वाळू उपसा करण्यासाठी शासन सकारात्मक निर्णय घेईल. दगड खाणी व क्रशर व्यवसाय पूर्ववत सुरू होईल, अशी माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील क्रशर मालक, खाण व्यावसायिकांच्या शिष्टमंडळासमवेत मंत्रालयात झालेल्या बैठकीत त्यांनी वरील माहिती दिली. शासनाच्या सकारात्मक भूमिकेने खाण, वाळू व्यवसायिकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
बुधवारी (दि.१६) मंत्रालयात मंत्री विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मजूर संघाचे संचालक तानाजी पोवार यांच्यासह वाळू, खाण व्यवसायिक, क्रशर मालक उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेत हरित लवादाच्या निर्बंध व नवीन अटीमुळे अडचणीत आलेला गौण खनिज व्यवसायिकांना दिलासा देण्यासाठी, सततच्या पूर परिस्थितीवर उथळ नदी पात्रामुळे वाळू उपशाबाबत राज्य शासनाने सकारात्मक धोरण राबवावे, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.
यावर विखे पाटील यांनी पर्यावरण विभागातील तज्ज्ञांशी चर्चा करून शक्य तितक्या लवकर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. तसेच पारंपारिक व्यवसायिक असलेला वडार समाजाला उभारी देण्यासाठी कुटुंबाला २०० ब्रास पर्यंत रॉयल्टी माफ करुन दिलासा द्यावा, याकडे तानाजी पोावार यांनी लक्ष वेधले. यावर मंत्री पाटील यांनी यासंदर्भात जिल्हाधिकार्यांना लवकरात लवकर आदेश देवू, असे आश्वासन दिले. बैठकीस अॅड.शाहू काटकर, रमेश कलकुटकी, अबूब डांगे आदी उपस्थित होते.