कोल्हापूर

कोल्हापूर : एस.टी. चालकाचा कासारी नदीत बुडून मृत्यू

दिनेश चोरगे

कळे; पुढारी वृत्तसेवा : पन्हाळा तालुक्यातील वाळोली-कसबा बोरगाव (ता.पन्हाळा) दरम्यानच्या कासारी नदीवरील बंधाऱ्यावर पोहायला गेलेल्या एस.टी.चालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. नारायण धोंडीराम जाधव (वय ५२, रा.पोहाळे तर्फ बोरगाव) असे त्यांचे नाव असून ही घटना सोमवारी (दि.२०) सकाळी आठच्या सुमारास घडली.

याबाबत अधिक माहिती अशी, नारायण जाधव हे गेल्या २५ वर्षांपासून एस.टी.महामंडळाच्या संभाजीनगर आगारात चालक म्हणून कार्यरत होते. ते रोज सकाळी कासारी नदीमध्ये पोहायला जात असत. 'पट्टीचा पोहणारा' म्हणून त्यांची परिसरात ओळख होती. सोमवारी सकाळी साडेसहा वाजता ते नेहमीप्रमाणे वाळोली – बोरगाव बंधाऱ्यावर पोहायला गेले. याठिकाणी बंधाऱ्याचे दरवाजे धरल्याने पाणीसाठा थोडा जास्त आहे. नदीमध्ये बराच वेळ पोहोल्यानंतर अचानक त्यांची दमछाक झाल्याने ते पाण्यात बुडाल्याचे या ठिकाणच्या नागरिकांनी सांगितले. तसेच बंधाऱ्याच्या वरच्या बाजूस बुडालेले नारायण जाधव हे पाण्याच्या प्रवाहामुळे दरवाज्यातून वाहून बंधाऱ्याच्या खालच्या बाजूस गेल्याचेही काहींनी सांगितले. शोधाशोध करुनही ते सापडले नसल्याने सकाळी दहाच्या सुमारास पोलिस ठाणे व रेस्क्यू टिमला बोलावण्यात आले. यावेळी सुमारे साडेसहा तास शोधमोहीम चालली. दुपारी साडेचारच्या सुमारास त्यांचा मृतदेह सापडला. घटनेची नोंद कळे पोलीस ठाण्यात झाली असून पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआरला पाठविला. मृत नारायण जाधव यांच्यामागे पत्नी, मुलगा, दोन विवाहित मुली, आई असा परिवार आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT