शिरढोण : टाकवडे (ता. शिरोळ) येथील शेतकरी सचिन पाटील यांच्या एक एकर क्षेत्रातील मिरची पिकावर बोकड्या रोगाचा तीव्र प्रादुर्भाव झाल्याने अखेर संपूर्ण पीक उपटून टाकण्याची वेळ आली. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला असून शासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पाटील यांनी यंदाच्या हंगामात मोठ्या आशेने एक एकर क्षेत्रात मिरचीची लागवड केली होती. रोपे, खते, औषधे, ठिबक व्यवस्था, मशागत आणि मजुरी यावर एक लाख रुपयांहून अधिक खर्च करण्यात आला होता. सुरुवातीला पीक जोमात होते. मात्र काही दिवसांतच पानांची आकसण, झाडांची वाढ खुंटणे आणि फुलधारणेवर परिणाम होणे अशी बोकड्या रोगाची लक्षणे दिसू लागली. रोगाचा प्रादुर्भाव वाढत गेल्याने संपूर्ण शेतातील झाडे बाधित झाली आहेत.
रोग नियंत्रणासाठी विविध प्रकारची कीटकनाशके आणि औषधांची फवारणी करण्यात आली. कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार उपाययोजनाही राबविण्यात आल्या. मात्र रोग आटोक्यात न आल्याने उत्पादनाची सर्व आशा संपुष्टात आली. अखेर पुढील नुकसान टाळण्यासाठी संपूर्ण एक एकर क्षेत्रातील मिरचीची झाडे उपटून टाकण्यात आली.
यंदा मिरचीला चांगला दर मिळत असताना हाती आलेले पीक नष्ट झाल्याने पाटील यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. वाढते उत्पादन खर्च, अवकाळी हवामान आणि रोगराई यामुळे शेतकरी आधीच अडचणीत असताना या नुकसानीने त्यांची चिंता आणखी वाढली आहे. कृषी विभागाने तत्काळ पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांतून होत आहे.
"नुकसानभरपाईची मागणी"
"मिरची पिकासाठी मोठा खर्च केला होता. रोग नियंत्रणासाठी अनेक उपाय केले; मात्र त्याचा उपयोग झाला नाही. संपूर्ण पीक उपटून टाकावे लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने पंचनामा करून तातडीने नुकसानभरपाई द्यावी," अशी मागणी शेतकरी सचिन पाटील यांनी केली आहे. तसेच बोकड्या रोगाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाने विशेष मोहीम राबवावी, अशीही मागणी होत आहे.