Adhik maas gift Silver Kolhapuri chappal
कोल्हापूर: देशात सध्या महागाई आणि सोने-चांदीच्या वाढत्या दरांवरून सर्वसामान्य लोक तणावात असतानाच, दुसरीकडे कोल्हापुरात एका जावईबापूंना मिळालेल्या अनोख्या भेटीने सर्वांचेच डोळे दिपवले आहेत. धोंड्याच्या (अधिक) महिन्यानिमित्त जावयाचा मानपान करण्यासाठी सांगलीतील एका बड्या उद्योजकाने तब्बल ४ लाख २२ हजार रुपयांचे दीड किलो चांदीचे कोल्हापुरी पायतान बनवून घेतले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना एक वर्ष सोनं-चांदी खरेदी करू नका, असे आवाहन केले असले तरी, श्रीमंत वर्गातील हौस आणि परंपरेचा उत्साह अजिबात कमी झालेला दिसत नाही. सांगलीतील एका प्रतिष्ठित उद्योजकाने आपल्या जावयाचा मानपान शाही आणि अविस्मरणीय करण्यासाठी ही अनोखी ऑर्डर दिली होती.
कोल्हापूरच्या चपला जगप्रसिद्ध आहेतच, पण या चपलांना चांदीची झळाळी देण्यासाठी कोल्हापुरातील कुशल कारागिरांनी दिवस-रात्र मेहनत घेतली. संपूर्ण पारंपरिक डिझाईन आणि नक्षीकाम करत कारागिरांनी दीड किलो शुद्ध चांदीचा वापर करून देखणा कोल्हापुरी जोडा तयार केला आहे. बारीक नक्षीकाम आणि फिनिशिंगमुळे या चपलांचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे. या चपलांची किंमत सुमारे ४ लाख २२ हजारांच्या घरात गेली आहे.
अधिक महिन्यात जावयाला वाण देण्याची जुनी परंपरा आहे. मात्र, महागाईचा भडका उडालेला असतानाही परंपरा, प्रतिष्ठा आणि आपली हौस भागवण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्याची श्रीमंत वर्गाची तयारी या घटनेतून पुन्हा एकदा समोर आली आहे. धोंड्याच्या महिन्यात जावयासाठी दिलेल्या या महागड्या आणि आकर्षक चांदीच्या कोल्हापुरी पायतानची चर्चा सध्या राज्यात रंगली आहे.