सेनापती कापशी : जगातील सर्वात उंच रणांगण... जिथे प्रत्येक क्षणी जीव धोक्यात असतो, जिथे गोठवणार्या वार्यांनाही जवानांच्या हिमतीसमोर नतमस्तक व्हावे लागते, अशा ठिकाणी आपल्या जवानांसाठी दै. ‘पुढारी’ने उभारलेले सुसज्ज रुग्णालय पाहून सेनापती कापशीचे माजी सैनिक हवालदार अशोक शंकर जगदाळे यांच्या डोळ्यांत अभिमानाचे आणि समाधानाचे अश्रू दाटून आले.
हवालदार जगदाळे यांचा मुलगा सध्या लेह येथे कार्यरत आहे. त्याला भेटण्यासाठी पत्नीसमवेत गेलेल्या या माजी सैनिकाने प्रतापूर (ग्लेशियर) येथे ‘पुढारी’च्या कारगिल फंडातून उभारलेल्या रुग्णालयाला भेट देण्याचा मनोदय व्यक्त केला. सहा तासांचा खडतर डोंगराळ प्रवास करून ते जेव्हा रुग्णालयाच्या दाराशी पोहोचले, तेव्हा त्यांच्या हृदयात जुन्या आठवणींनी दाटून आले. कारण, 1988 मध्ये त्यांची याच ठिकाणी पोस्टिंग झाली होती आणि तेव्हा त्यांनी या भागात इंजिनिअरचे काम केले होते.
आज मात्र त्यांच्या डोळ्यांसमोर आधुनिक, वातानुकूलित, दोन मजली रुग्णालय उभे होते. आत शिरताच पहिल्यांदा द़ृष्टीस पडला तो डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा दिमाखदार फोटो ‘सियाचीन हॉस्पिटल के जनक’ या शब्दांनी गौरवलेला. दोन कोटी तीस लाख रुपयांचा निधी उभारून हे स्वप्न सत्यात उतरवले गेले. तो कोल्हापूरचा, ‘पुढारी’चा वाटा आहे, ही जाणीव होताच माझा ऊर अभिमानाने भरून आला, असे सांगताना जगदाळे यांचा आवाज दाटून आला.
सीमेवर जखमी वा आजारी जवानांची तातडीने सेवा करणारे हे रुग्णालय म्हणजे जवानांसाठी जीवनदानच आहे. आज या बर्फाळ प्रदेशात जेव्हा एखादा जवान उपचारांसाठी इथे येतो, तेव्हा त्याच्या डोळ्यांत आशेचा किरण जागतो आणि त्या प्रत्येक क्षणामागे ‘पुढारी’च्या कारगिल फंडाचा मूक वाटा असतो. या रुग्णालयाच्या उद्घाटनाचा स्मृतिफलक बाहेर ग्रॅनाईटवर कोरलेला आहे. त्यावर मा. डॉ. प्रतापसिंह जाधव (मुख्य अतिथी) असा उल्लेख आहे. तत्कालीन संरक्षणमंत्री स्व. जॉर्ज फर्नांडिस यांच्या हस्ते 18 नोव्हेंबर 2001 रोजी या रुग्णालयचे उद्घाटन झाले होते. त्या फलकासमोर उभा राहताना जगदाळे यांना आपल्या मातीतल्या वृत्तपत्राने सैनिकांसाठी केलेल्या योगदानाचा अभिमान उरात दाटून आला.
हा अनुभव शब्दांत सांगता येत नाही. मी स्वतः सैनिक असल्याने आणि माझा मुलगा आजही सीमेवर कार्यरत असल्याने, कोल्हापूरकर असल्याचा अभिमान माझ्या रक्तात दाटला. दै. ‘पुढारी’ने घडवलेली ही कामगिरी म्हणजे कोल्हापूरच्या संस्कारांची साक्षच आहे.अशोक जगदाळे, माजी सैनिक, सेनापती कापशी