

मध्याळ : आजीकडे कर्ज भागविण्यासाठी वारंवार पैशाची मागणी करुनही आजी पैसे देत नसल्याने मित्रांच्या सहाय्याने सगुणा तुकाराम माधव (वय ८२) या आजीचा गळा घोटणाऱ्या नातवाला दोन मित्रांसह स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने अटक केली. सेनापती कापशी (ता.कागल) येथे भरदिवसा घडलेल्या या घटनेबाबत दुसरा नातू सुशांत पुंडलिक जाधव यांनी मुरगुड पोलिसात तक्रार दाखल केली.
मृत आजीच्या मुलगीचा मुलगा गणेश राजाराम चौगले (वय 22, रा.विक्रमनगर इचलकरंजी) व त्याच्या मित्र नरेश उर्फ नरेंद्र दगडु करपे (वय 25) याच्यासह एका अल्पवयीनला इचलकरंजी शहरातून ताब्यात घेतले आहे. त्यांना न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दाखल गुन्ह्या नुसार, संशयित नातू गणेश राजाराम चौगले याने काढलेले कर्ज फेडण्यासाठी इचलकरंजीतील विक्रमनगर येथील राहते घर विकले होते. तरीसुद्धा लोकांचे देणे लागत होते. सगुणा हिच्या नावे बँकेत दोन लाख रुपये शिल्लक होते म्हणून त्याने आजीकडे एक लाख रुपयांची मागणी केली होती. पण आजीने नकार दिल्याने मित्राच्या मदतीने तिचा गळा आवळून खून केला. पोलिसांनी संशयित आरोपी कडून सोन्याच्या पाटल्या, कर्णफुले व मोटरसायकल असे चार लाख किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपींना २४ तासात अटक करणेसाठी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सपोनि चेतन मसुटगे, पोलिस उप निरीक्षक शेष मोरे व मुरगुड पोलिसांनी अथक प्रयत्न केले. पुढील तपासासाठी आरोपीनी मुरगुड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
संशयित आजीकडे येत होता हे आजीच्या दुसऱ्या गल्लीत राहणाऱ्या नातवाला माहिती होते. घटनेच्या दिवशी याच फिर्यादी नातवाने (मुलग्याचा मुलगा) संशयित आरोपी गणेश चौगले व त्याच्या साथीदारास पहिले होते. त्यावरून पोलिसांनी तत्काळ या घटनेचा तपास करून चोवीस तासाच्या आत सर्व संशयित आरोपींना अटक केली.