विशाळगड : करंजोशी (ता. शाहूवाडी) येथील एका कुटुंबाला ७६ हजार ८३० रुपयांचे वीज बिल आल्याने मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे हे कुटुंब मुंबईत वास्तव्यास असून, त्यांचे गावचे घर नेहमी बंदच असते. केवळ सणासुदीलाच ते गावी येत असल्याने विजेचा वापर जवळजवळ शून्य असतानाही एवढे प्रचंड बिल आल्याने महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा प्रकार स्मार्ट मीटरमुळे घडल्याचे समोर आले आहे.
या कुटुंबाचे चार महिन्यांपूर्वीच जुन्या मीटरऐवजी स्मार्ट मीटर बसवण्यात आले होते. कोणताही वापर नसतानाही या नवीन मीटरने ७६ हजारांचे बिल दाखवल्याने ग्राहक हादरले आहेत. या प्रकरणात केवळ जास्त बिल येण्याचाच मुद्दा नाही, तर महावितरणच्या ढिसाळ कारभाराचा पर्दाफाश झाला आहे. अनेक ग्राहकांच्या तक्रारी आहेत की, त्यांची संमती न घेता परस्पर जुने मीटर बदलून स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत.
याहून गंभीर बाब म्हणजे, शाहूवाडी परिसरातील काही घरांवर प्रत्यक्षात जुने मीटरच अजूनही बसवलेलेआहेत, तरीही गेल्या सात महिन्यांपासून त्यांना स्मार्ट मीटरचे बिल येत आहे. जुन्या मीटरवरील नंबर आणि बिलावरील नंबर यात फरक असल्याचेही उघड झाले आहे. यामुळे ग्राहकांची एकप्रकारे फसवणूकच होत असल्याचे चित्र आहे. पुणे, मुंबई येथे राहणाऱ्या अनेक लोकांच्या बाबतीत परस्पर मीटर बदलल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
महावितरणचा हा गलथान कारभार आणि बेजबाबदारपणा यामुळे ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. 'जुने मीटर कोणी आणि कोणाच्या परवानगीने बदलले, याची तपासणी झाली आहे का?' असे अनेक प्रश्न नागरिक विचारत आहेत. या गंभीर प्रकाराबाबत महावितरणने तातडीने लक्ष घालून ग्राहकांना न्याय द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
" वीज बिलातील ही चूक कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे घडली असून, ग्राहकाचे बिल दुरुस्त केले आहे. कर्मचाऱ्यांनी बिले काढताना अधिक काळजी घ्यावी, अशा सूचना दिल्या आहेत."- प्रवीण कुंभारे, उपकार्यकारी अभियंता, शाहूवाडी