कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा छत्रपती शिवाजी महाराज यांचा ६ जून १६७४ रोजी राज्याभिषेक सोहळा रायगडावर पार पडला. शिवरायांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार झाले. बुद्धी, शौर्य, धडाडी, निष्ठा आणि धैर्य या जोरावर महाराजांनी शत्रूंना पराभूत करुन भारतभूमीवर आपली पकड मजबूत केली. या कार्यात शिवरायांना मावळ्यांची अखंड साथ आणि जनतेचे अमुल्य प्रेम मिळाले. आजही प्रत्येक माणसाच्या मनात शिवरायांचे स्थान अबाधित आहे असे प्रतिपादन शिवसेना तालुका प्रमुख वैभव उगळे यांनी केले.
येथील शिवतीर्थ येथे आज (मंगळवार) पहाटे शिवतीर्थ समिती व छत्रपती संभाजी महाराज बलिदानमास समितीच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला दुग्धभिषेक,जलाभिषेक आणि पुष्पाभिषेक घालून राज्याभिषेक सोहळा विधिवत आणि थाटामाटात पार पडला. छत्रपती शिवाजी महाराज की जय" हर हर महादेव, जय जिजाऊ जय शिवराय, जय भवानी जय शिवाजी' या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.
संयुक्त समितीच्या वतीने कृष्णा नदीचे पूजन करून कृष्णा नदीचे जल कलशाने आणून शिवरायांच्या मूर्तीला अभिषेक ध्येय-मंत्र,प्रेरणा मंत्र आणि आरती करून हलगी-खैताळ-शिंगाच्या निनादात शिवरायांच्या जयघोषात शिवराज्याभिषेक साजरा करण्यात आला.
यावेळी काही चिमुकल्यांनी शिवचरित्रावर आधारित पोवाडे सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कुरुंदवाड नगरपरिषद, शहरातील शिवहिंद मंडळ, युवक आझाद मंडळ, मराठा मंडळ मध्यवर्ती कार्यालय, सकल मराठा मंडळ आदि तरुण मंडळे आणि ग्रामीण भागात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून राज्याभिषेक सोहळा पार पडला.
हेही वाचा :