शिरढोण : नृसिंहवाडी येथे २०२८ मध्ये होणाऱ्या कन्यागत महापर्वाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी यड्राव जिल्हा परिषद मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी तब्बल १३ कोटी ३० लाख रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. जिल्हा परिषद सदस्या अर्चना अमोल चौगुले यांनी यासंदर्भातील प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हा परिषद प्रशासनाकडे सादर केला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुमारे ४ कोटी रुपयांची रस्ते व बंदिस्त गटरांची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. यामध्ये जांभळी-टाकवडे ते नृसिंहवाडी मार्गाची सुधारणा, टाकवडे येथील शाहू चौक परिसरातील रस्ते व गटरांची कामे तसेच नांदणी येथील काळभैरव मंदिर ते शिरढोण कोईक पेट्रोल पंप मार्गावरील २ कोटी रुपयांच्या रस्ता सुधारणा कामाचा समावेश आहे.
याशिवाय जिल्हा परिषदेकडे ९ कोटी ३० लाख रुपयांच्या विविध विकासकामांची मागणी करण्यात आली आहे. टाकवडे येथील ईदगाह परिसर, काटकर मळा, खोत मळा आणि बोरगावे मळा परिसरातील सुमारे २ कोटी रुपयांच्या रस्ता सुधारणा कामांसह शिरढोणमधील हरगुल रस्ता ते एसएच-२०० मार्गासाठी १.५० कोटी रुपये, गावकुरण ते लक्ष्मी मंदिर मार्गासाठी १ कोटी रुपये तसेच विविध अंतर्गत रस्ते आणि गटरांच्या कामांचा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे.
कन्यागत महापर्वादरम्यान लाखो भाविक नृसिंहवाडी परिसरात येणार असल्याने वाहतूक, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधांवर मोठा ताण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाविक आणि स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी आवश्यक विकासकामांना तातडीने मंजुरी व निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी अर्चना अमोल चौगुले यांनी केली आहे.
घरकुल दुरुस्ती योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी
दरम्यान, राजर्षी शाहू घरकुल दुरुस्ती योजना पूर्ववत सुरू करण्याची मागणीही अर्चना चौगुले यांनी केली आहे. जुन्या व जीर्ण झालेल्या घरकुलांच्या दुरुस्तीसाठी अनुसूचित जाती व जमातीतील पात्र लाभार्थ्यांना प्रत्येकी १ लाख रुपयांचे अनुदान देण्याचा विषय जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मांडावा, अशी त्यांनी मागणी केली आहे. तसेच अनुसूचित जाती-जमातीच्या नागरिकांच्या विकासासाठी जिल्हा परिषदेमार्फत विविध योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.