Laborer stabbed in Shirol
शिरोळ : शिरोळ येथील कनवाड मार्गावर आण्णासो महात्मे यांच्या शेतात सुरू असलेल्या बांधकामावर अज्ञातांकडून धारदार शस्त्राने राजू दिलीप कोलप ( वय अंदाजे ४० रा. निलजी बामणी ता.मिरज जि. सांगली) या मजुराचा निर्घृणपणे खून करण्यात आल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत शिरोळ पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा व फॉरेन्सिक पथकाची तपासणी सुरू होती.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, शिरोळ-कनवाड रस्त्यावरील आण्णासो महात्मे यांच्या शेतात घराचे बांधकाम सुरू आहे. बांधकामासमोर त्यांचा जनावरांचा गोठा आहे. सोमवारी सायंकाळी महात्मे कुटुंबातील व्यक्ती जनावरांचे चारापाणी करण्यासाठी गेले होते.
यादरम्यान त्यांना बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी एक व्यक्ती झोपल्याचे दिसून आले. त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता या व्यक्तीच्या अंगावर धारदार शस्त्राने वार केले गेले असुन मयत झालेल्या अवस्थेत दिसून आला. घटनेची माहिती त्यांनी तात्काळ शिरोळ पोलीस ठाण्यास दिली.