STP Project Shirdhon Kolhapur Pudhari
कोल्हापूर

Kolhapur News | चार वर्षे रखडलेला सांडपाणी प्रकल्प मार्गी; शिरढोणमध्ये दोन ठिकाणी उभारणी

हरगुल रस्त्यावरील जागेत ७५ हजार लिटर क्षमतेचा तर नदीघाट स्मशानभूमी रस्त्यावरील जागेत ५० हजार लिटर क्षमतेचा प्रकल्प उभारला जाणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

STP Project Shirdhon Kolhapur

शिरढोण : शिरढोण (ता. शिरोळ) येथे गेली चार वर्षे प्रलंबित असलेला सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प अखेर मार्गी लागण्याच्या दिशेने पुढे सरकला आहे. गावात दोन ठिकाणी हा प्रकल्प उभारण्यात येणार असून त्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. हरगुल रस्त्यावरील जागेत ७५ हजार लिटर क्षमतेचा तर नदीघाट स्मशानभूमी रस्त्यावरील जागेत ५० हजार लिटर क्षमतेचा प्रकल्प उभारला जाणार आहे.

या पार्श्वभूमीवर सोमवारी शिरोळ ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता सूर्यकांत कोडोले, ठेकेदार जुबेर इनामदार, नाना पाटील व शीतल पाटील यांच्या पथकाने नियोजित जागेची पाहणी केली. या प्रकल्पामुळे परिसरात दुर्गंधी निर्माण होणार नाही तसेच शेतकऱ्यांनाही कोणतेही नुकसान होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पथकाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवसांत नियोजित जागेची स्वच्छता करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.

शिरढोण गावातील सांडपाण्याची समस्या सोडवण्यासाठी मृदा जैवतंत्रज्ञानावर आधारित सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानात माती, खनिज माध्यम आणि सूक्ष्मजीवांच्या साहाय्याने सांडपाणी नैसर्गिक पद्धतीने शुद्ध केले जाते. त्यामुळे सांडपाण्यातील जैविक व रासायनिक अशुद्धता कमी होऊन पाणी स्वच्छ होते. शुद्ध झालेले पाणी बागकाम, शेती, शौचालय वापर तसेच भूजल पुनर्भरणासाठीही उपयोगात आणता येणार आहे. सौरऊर्जेचा वापर, कमी देखभाल खर्च आणि रासायनिक पदार्थांची आवश्यकता नसल्यामुळे ही पद्धत ग्रामीण भागासाठी अधिक उपयुक्त ठरणार आहे.

यावेळी माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य चंद्रकांत मोरे, अविनाश पाटील, विश्वास बालीघाटे, रावसाहेब यमकनमर्डे, यशवंत कुंभार, जब्बार नालबंद आदी उपस्थित होते.

'दै. पुढारी'च्या वृत्तानंतर प्रशासन हलले

शिरढोण येथील सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पासाठी सुमारे ७४ लाख रुपयांचा निधी मंजूर होऊनही काम चार वर्षे रखडले होते. या संदर्भात दैनिक पुढारीने सातत्याने वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीचे अधिकारी पाहणीसाठी आले असून लवकरच काम सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुढारीच्या पाठपुराव्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT