कोल्हापूर

Shirdhon Kolhapur news : शिरढोण परिसरात खरीप पेरणीला वेग; पंचगंगेची वाढती पातळी पाहून शेतकऱ्यांची धावपळ

नदीच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही मुसळधार पाऊस सुरू असल्याने पंचगंगा नदीची पाणीपातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे

पुढारी वृत्तसेवा

शिरढोण : महिनाभरापासून रानाची मशागत करून पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. गेल्या आठ दिवसांपासून नदीच्या पाणलोट क्षेत्रात दमदार, तर परिसरात रिमझिम व मध्यम स्वरूपाचा पाऊस होत असल्याने शिरढोण, टाकवडे, जांभळी आणि हरोली परिसरात खरीप पेरणीच्या कामांना वेग आला आहे. मात्र, दुसरीकडे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांची शेती साहित्य सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी मोठी धावपळ उडाली आहे.

बदलत्या हवामानामुळे पिकांच्या रचनेत बदल

पहिल्या समाधानकारक पावसानंतर शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर व आधुनिक यंत्रांच्या साहाय्याने पेरणीची कामे युद्धपातळीवर सुरू केली आहेत. गतवर्षीच्या लहरी पाऊस आणि महापुराच्या कटू अनुभवामुळे यंदा अनेक शेतकऱ्यांनी आपल्या पीक पद्धतीत बदल केला आहे. यंदा सोयाबीनऐवजी भुईमूग, भात, मका, उडीद तसेच विविध भाजीपाला पिकांच्या लागवडीला शेतकरी प्राधान्य देत आहेत. परिसरात अनेक ठिकाणी भात रोपवाटिका तयार करण्याचे काम सुरू असून, काही ठिकाणी भात लागवडीलाही प्रारंभ झाला आहे. ऊस उत्पादक शेतकरी सध्या उसाला खत देणे, मशागत, तणनियंत्रण आणि फवारणीच्या कामात व्यस्त आहेत. पुढील काही दिवस पावसाने अशीच साथ दिल्यास उर्वरित पेरण्या लवकरच पूर्ण होऊन यंदाचा खरीप हंगाम भरघोस होईल, अशी आशा व्यक्त होत आहे.

संभाव्य पुराचा धोका ओळखून शेतकरी सतर्क

नदीच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही मुसळधार पाऊस सुरू असल्याने पंचगंगा नदीची पाणीपातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरवर्षी नदीला अचानक पूर आल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. हाच पूर्वअनुभव लक्षात घेऊन शिरढोण, टाकवडे व हरोली परिसरातील नदीकाठच्या शेतकऱ्यांनी यंदा आधीच खबरदारी घेतली आहे. शेतातील महागड्या विद्युत मोटारी, पंपसंच, पाइपलाइन व इतर साहित्य सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी ट्रॅक्टरच्या साहाय्याने तर काही ठिकाणी कुटुंबीयांच्या मदतीने हे साहित्य उंच भागात पोहोचवले जात असून, संभाव्य पुराचा फटका बसू नये म्हणून शेतकरी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

कृषी सेवा केंद्रांवर गर्दी

बियाणे-खतांना मागणीखरीप पेरण्यांना वेग आल्यामुळे परिसरातील कृषी सेवा केंद्रांवर बियाणे, खते व कीडनाशकांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत आहे. भुईमूग, भात, मका, उडीद व भाजीपाल्याच्या बियाण्यांना विशेष मागणी असून, यंत्रे आणि मजुरांचीही धावपळ वाढली आहे. वेळेत पाऊस कायम राहिल्यास यंदाचा खरीप हंगाम समाधानकारक ठरेल, असा विश्वास शेतकरी व्यक्त करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT