विशाळगड : सुभाष पाटील
नूतन वर्षाचे स्वागत आणि 'थर्टी फर्स्ट'च्या सेलिब्रेशनसाठी कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गासह आंबा घाट आणि विशाळगड परिसरातील निसर्गरम्य ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, शाहूवाडी पोलिसांनी तालुक्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कंबर कसली आहे. हुल्लडबाजी, मद्यप्राशन करून वाहन चालवणे आणि सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
महामार्गावर नाकाबंदी आणि 'ब्रीथ अॅनालायझर'चा वापर
कोल्हापूर-रत्नागिरी या मुख्य राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी नाकाबंदी लावण्यात येणार आहे. मद्यप्राशन करून वेगाने वाहने चालवणाऱ्या चालकांमुळे अपघात होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी पोलीस पथके 'ब्रीथ अॅनालायझर' यंत्राद्वारे वाहनचालकांची तपासणी करणार आहेत. दोषी आढळणाऱ्यांवर जागेवरच दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
आंबा घाट आणि पर्यटनस्थळांवर साध्या वेशातील पोलीस
पर्यटकांचे आकर्षण असलेल्या आंबा घाट आणि मलकापूर परिसरात विशेष गस्त वाढवण्यात आली आहे. महिलांची छेडछाड किंवा गैरप्रकार रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसेच, विनापरवाना चालणाऱ्या पार्ट्या आणि ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल चालकांवरही पोलिसांची करडी नजर राहणार आहे.
पोलिसांचे आवाहन:
- मद्यपान करून वाहन चालवू नका, स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नका.
- रात्री १० नंतर ध्वनीप्रदूषणाचे नियम पाळा.
- कोणताही अनुचित प्रकार घडल्यास तात्काळ शाहूवाडी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा
"नूतन वर्षाचे स्वागत सर्वांनी आनंदाने आणि शिस्तीत करावे. मात्र, आनंदाच्या भरात सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे, मद्यप्राशन करून वाहने चालवणे किंवा हुल्लडबाजी करून इतरांना त्रास देणे खपवून घेतले जाणार नाही. शाहूवाडी पोलिसांनी तालुक्यात ठिकठिकाणी विशेष पथके तैनात केली असून सीसीटीव्हीच्या माध्यमातूनही आमची नजर आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. सुरक्षित राहा आणि जबाबदार नागरिक म्हणून नवीन वर्षाचे स्वागत करा."— विजय घेरडे (पोलीस निरीक्षक, शाहूवाडी)