Kolhapur Shahuwadi Crop Damage
आनंदा केसरे
बांबवडे : शाहूवाडी तालुक्यात गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके गंभीर संकटात सापडली आहेत. पावसाअभावी भात, भुईमूग, सोयाबीन तसेच रताळी या प्रमुख पिकांची मोठी हानी झाली असून, अनेक ठिकाणी पिके शेतातच करपून गेली आहेत. ऐन दाणे व कंद भरण्याच्या अवस्थेत पावसाने खंड दिल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, प्रशासनाने तातडीने पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
हंगामाच्या सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी वेळेत पेरण्या आणि भाताची लावणी पूर्ण केली होती. सुरुवातीला पिकांची वाढही चांगली झाली. मात्र, गेल्या सुमारे तीस दिवसांपासून पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्याने जमिनीतील ओलावा संपला आहे. तीव्र उन्हामुळे जमिनीला भेगा पडल्या असून, हिरवीगार पिके डोळ्यांदेखत वाळत असल्याचे चित्र अनेक भागांत दिसत आहे.
तालुक्यातील प्रमुख पीक असलेल्या भाताला सध्या लोंब्या भरण्याच्या अवस्थेत पाण्याची मोठी गरज आहे. मात्र, पावसाअभावी भात पिकाला पाण्याचा ताण बसला असून, लोंब्यांमध्ये दाणे पूर्णपणे न भरता फोलपट राहण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत.
भुईमुगाच्या पिकालाही पावसाच्या खंडाचा मोठा फटका बसला आहे. जमीन कडक झाल्याने भुईमुगाच्या आऱ्या जमिनीत व्यवस्थित शिरत नसून शेंगा पोसण्याची प्रक्रिया प्रभावित झाली आहे. रताळी पिकाच्या कंदांच्या वाढीवरही प्रतिकूल परिणाम झाला आहे. सोयाबीनच्या वाढीलाही पावसाअभावी अडथळा निर्माण झाला आहे.
पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे पिकांची वाढ खुंटली असून, धान्याचा दर्जा आणि वजनावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाच्या खरीप उत्पादनात मोठी घट होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. बियाणे, खते, औषधे आणि मशागतीवर केलेला खर्चही वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा, राधानगरी, आजरा, भुदरगड, गगनबावडा आणि चंदगड या तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, शाहूवाडी तालुक्याचा या यादीत समावेश न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तालुक्यातील प्रत्यक्ष पिकांची परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने फेरविचार करावा आणि नुकसानग्रस्त भागात तातडीने पंचनामे करावेत, अशी मागणी होत आहे. लोकप्रतिनिधींनीही शासनाकडे ठोस पाठपुरावा करून शेतकऱ्यांना दिलासा मिळवून द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे शाहूवाडीतील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तालुक्यात त्वरित संयुक्त पंचनामे सुरू करावेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत व पीक विम्याची भरपाई मंजूर करावी. —- विजय चिखलकर (जिल्हा अध्यक्ष, रयत क्रांती संघटना)