ज्येष्ठ पैलवान बंडा पाटील रेठरेकर Pudhari
कोल्हापूर

Banda Patil Retharekar | पै. बंडा पाटील रेठरेकर यांच्यावर आवश्यक उपचारांची कुटुंबीयांना आरोग्यमंत्र्यांची ग्वाही; कोल्हापुरात दाखल करण्याच्या सूचना

'दै. पुढारी'च्या वृत्ताची आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांकडून तातडीने दखल

पुढारी वृत्तसेवा

Banda Patil Retharekar Kolhapur Hospitalization Treatment

आनंदराव केसरे

बांबवडे : टोकियो ऑलिम्पिक (१९६४) मध्ये भारतीय कुस्ती संघाचे प्रतिनिधित्व करणारे तसेच राज्य व राष्ट्रीय पातळीवरील कुस्ती स्पर्धांमध्ये अनेक पदके पटकावून कोल्हापूरचा गौरव वाढविणारे ज्येष्ठ पैलवान बंडा पाटील रेठरेकर हे सध्या आजारी आहेत. प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे त्यांच्या औषधोपचाराची हेळसांड होत असल्याचे वृत्त 'दै. पुढारी’च्या ऑनलाइन आवृत्तीत सोमवारी प्रसिद्ध झाले. या वृत्ताची राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी तातडीने दखल घेतली.

पैलवान बंडा पाटील रेठरेकर यांनी कुस्ती क्षेत्रात सात वेळा ऑल इंडिया तसेच महाराष्ट्र चॅम्पियनशिप पटकावून कोल्हापूरसह महाराष्ट्राचा गौरव केला आहे. मात्र, त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीच्या तुलनेत शासनाकडून त्यांना अपेक्षित सन्मान आणि मदत मिळाली नाही. त्यामुळे आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांच्यावर हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगण्याची वेळ आली आहे. त्यांच्या आजारपणातही आर्थिक अडचणींमुळे उपचाराकडे दुर्लक्ष होत असल्याचे ‘दै. पुढारी’च्या वृत्तातून समोर आले होते.

हे वृत्त मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सोमवारी दुपारी आपल्या स्वीय सहायकामार्फत दैनिक ‘दै. पुढारी’शी संपर्क साधला. त्यानंतर त्यांनी पैलवान बंडा पाटील यांचे सुपुत्र दिनेश यांच्याशी थेट संवाद साधून त्यांच्या वडिलांच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे विचारपूस केली.

पैलवान बंडा पाटील यांना तातडीने कोल्हापूर येथे उपचारासाठी दाखल करा. त्यांच्या आवश्यक वैद्यकीय तपासण्या तसेच उपचारांची सर्व व्यवस्था करण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री आबिटकर यांनी दिनेश यांना दिली. तसेच, आपले स्वीय सहायक कुटुंबीयांच्या संपर्कात राहून पुढील सर्व व्यवस्था करतील, अशी खात्रीही त्यांनी दिली.

दरम्यान, या तातडीच्या दखलीबद्दल पैलवान बंडा पाटील यांचे सुपुत्र दिनेश यांनी 'दै. पुढारी’च्या प्रतिनिधीशी संपर्क साधून आभार व्यक्त केले. ‘पुढारी’च्या वृत्तामुळे आरोग्यमंत्र्यांनी तातडीने दखल घेतल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT