कसबा बावडा : पुढारी वृत्तसेवा
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या लक्ष्मीविलास पॅलेस मध्ये शिवशस्त्र शौर्यगाथा प्रदर्शनाचे उद्घाटन झाले; परंतु येथील दुसऱ्या टप्प्यात ४ कोटी ८२ लाख रुपये खर्चुन उभारलेल्या संग्रहालयाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. त्याचे लोकार्पण मात्र आचारसंहितेच्या लाल फितीत अडकले आहे.
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त २८ जून रोजी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी लक्ष्मीविलास पॅलेस येथील जन्मस्थळी भेट देऊन त्यांनी महाराजांना अभिवादन करत शाहू जन्मस्थळाच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.
परिपूर्ण अशा शाहू जन्मस्थळाचे लोकार्पण लवकरच करू, अशी ग्वाही त्यांनी दिली होती. उद्घाटनावेळी येथील समस्यांबाबत लवकरच बैठक घेऊ, आवश्यक कामांसाठी निधी कमी पडणार नाही, असेही आश्वासन त्यांनी दिले होते.
दरम्यान, वेळेची मर्यादा असलेल्या शिवशस्त्र शौर्यगाथा प्रदर्शनाचे काम सुरू होऊन ते पूर्णही झाले. त्याचे उद्घाटनही झाले; मात्र ज्या वास्तूत गेल्या १८ वर्षांपासून शाहू महाराजांशी संबंधित प्रदर्शनाचे काम सुरू आहे, त्याचे लोकार्पण अद्याप झालेले नाही. राज्यात नगरपालिका, नगरपरिषद यांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे.
आचारसंहिता लागू झाली आहे. पाठोपाठ पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्या निवडणुकांची आचारसंहिता लागेल. त्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागेल. या सर्वांमध्ये तीन महिन्यांचा कालावधी जाणार आहे. शिवशस्त्र शौर्यगाथा प्रदर्शनाच्या निमित्ताने दररोज शेकडो शिवप्रेमी, विद्यार्थी जन्मस्थळाला भेट देत आहेत. एकाच वेळी दोन्हीचे उद्घाटन झाले असते, तर शाहू महाराजांचा इतिहासही विद्यार्थ्यांना सचित्र समजला असता. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील वरिष्ठ यांच्यातील अनास्थेमुळे शाहू जन्मस्थळातील दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण रखडले आहे.
शिवशस्त्र शौर्यगाथा प्रदर्शनाबरोबर शाहू जन्मस्थळातील दुसऱ्या टप्प्यातील कामांचे लोकार्पण झाले असते, तर ते अधिक योग्य झाले असते. याबाबत मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना निवेदनाद्वारे मागणी केली होती; पण यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. जन्मस्थळावरील पहिल्या टप्प्यातील कामांचे लोकार्पण जनतेनेच केले. त्याचप्रमाणे दुसऱ्या टप्प्यातील कामांचे लोकार्पणही जनतेनेच करावे का, असा सवाल शाहूप्रेमींतून केला जात आहे.