

कोल्हापूर महापालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. प्रभागरचना अंतिम झाल्यानंतर आता मंगळवारी (दि. ११ नोव्हेंबर) आरक्षण सोडत जाहीर होणार असून, शुक्रवारी (दि. १४ नोव्हेंबर) मतदार याद्यांचे प्रारूप प्रसिद्ध होणार आहे.
निवडणुकीपूर्व सर्व प्रक्रिया जवळपास पूर्णत्वाला येत असून, महापालिकेवर वर्चस्वासाठी प्रत्यक्ष राजकीय रणांगण तापणार आहे. या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना अधिकृतपणे होणार असला, तरी प्रत्यक्षात मंत्री चंद्रकांत पाटील, हसन मुश्रीफ, महादेवराव महाडिक यांचा गट, राजेश क्षीरसागर विरुद्ध आ. सतेज पाटील आणि खासदार शाहू महाराज असा प्रतिष्ठेचा राजकीय संघर्ष रंगणार आहे.
प्रत्येक गट सत्तेची सूत्रे आपल्या हातात ठेवण्यासाठी गुप्त आघाड्यांपासून ते खुले डावपेच रचण्यापर्यंत राजकीय डाव टाकत आहे. पाच वर्षे उशिरा येणारी निवडणूक महापालिकेची निवडणूक तब्बल दहा वर्षांनी होत आहे. २०२० मध्ये होणारी निवडणूक कोव्हिड निर्बंध आणि ओबीसी आरक्षणातील गुंत्यात अडकली.
परिणामी, पाच वर्षे निवडणूक लांबली. आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दि. ३१ जानेवारी २०२६ पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणे बंधनकारक आहे. एक वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीतील उट्टे आता या निवडणुकीत काढून विरोधकांना शह दिला जाणार आहे. मुश्रीफ सतेज पाटील 'जोडी' आता प्रतिस्पर्धी महापालिकेत पंधरा वर्षांपासून कॉंग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता होती.
त्या काळात आ. सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी एकत्रितपणे महाडिकांच्या ताब्यातील सत्ता उलथवून महापालिकेत आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते; मात्र २०२२ नंतर परिस्थिती बदलली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली, अजित पवार हे स्वतंत्र गटासह महायुतीत गेले. त्यामुळे स्थानिक राजकारणात सतेज पाटील यांचे मित्र हसन मुश्रीफ हे अजित पवार गटात गेल्याने महाविकास आघाडीतील सतेज पाटील-मुश्रीफ या विजयी जोडगोळीचे समीकरण तुटले. आता सतेज पाटील यांना खासदार शाहू महाराजांचा हात मिळाल्याचे दिसते.
माजी आमदार मालोजीराजे यांच्या भूमिकेकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. तथापि, संपूर्ण आघाडीचा कणा हा आ. सतेज पाटीलच राहणार. विधानसभा निवडणुकीत झालेली दगाबाजी सतेज पाटील यांच्या जिव्हारी लागली आहे. त्यामुळे कोणाच्याही भरवशावर न थांबता महापालिकेवरील वर्चस्वासाठी ते झुंज देणार आहेत. दक्षिणेतील पराभवाचे उट्टे काढण्याची संधी माजी आ. ऋतुराज पाटील यांना आहे; परंतु त्यांनी आ. सतेज पाटील यांच्याप्रमाणे परिश्रम घेण्याची गरज आहे.
दोन पिढ्यांमध्ये संघर्ष
महापालिकेची निवडणूक लांबणीवर पडल्यामुळे दहा वर्षांचा काळ गेला. यामध्ये अनेक प्रभागांत घरामध्येच दोन पिढ्यांमध्ये उमेदवारीवरून संघर्ष सुरू आहे. कुठे बाप-मुलगा, कुठे काका-पुतण्या, तर कुठे भावाभावांमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. महापालिकेच्या राजकारणाची किंवा नगरसेवक होण्याच्या इच्छेमुळे घराघरांमध्येदेखील राजकीय संघर्ष निर्माण झाला आहे. याचा फायदा काही राजकीय पक्षदेखील घेत आहेत. वडील हाताशी लागले नाहीत, तर मुलग्याला आणि मुलगा हाताशी लागला नाही, तर वडिलांना हाताशी धरून राजकारण केले जात आहे. अनेक प्रभागांत हे चित्र दिसत आहे.