Crime News : गुडाळमध्ये एका रात्रीत सात बंद घरे फोडली! एक दुचाकीही लंपास! file photo
कोल्हापूर

Crime News : गुडाळमध्ये एका रात्रीत सात बंद घरे फोडली! एक दुचाकीही लंपास!

मंगळवारी पहाटे पोलिसांनी घटनास्थळी घरांना भेटी देऊन पाहणी केली.

पुढारी वृत्तसेवा

Seven Locked Houses Burglarized in a Single Night in Gudal! A Two-Wheeler Also Stolen!

गुडाळ : पुढारी वृत्तसेवा

राधानगरी तालुक्यातील गुडाळ गावात मंगळवारी पहाटे दोन तास चोरट्यांनी धुमाकुळ घालत बंद घरे लक्ष्य केली. यामध्ये चोरट्यांनी सात घरे फोडली. मात्र प्रकाश माळवी यांच्या एकाच घरात चोरट्यांना पंधरा हजार रुपये आणि काही चांदीचे दागिने हाती लागले. इतर सहा घरात मात्र चोरट्यांच्या हाती काहीही मौल्यवान ऐवज लागला नाही. दरम्यान, चोरीची वर्दी मिळताच पहाटे राधानगरी पोलिसांचे पथक गावात दाखल झाले आणि त्यांनी चोरट्यांना शोधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात यश आले नाही.

याबाबत घटनास्थळ आणि राधानगरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, गुडाळ- खिंडी व्हरवडे या मुख्य रस्त्यावर आशिष लक्ष्मणराव पाटील, प्रकाश कृष्णा पाटील, अभिजीत बाबुराव चौगले, साताप्पा भाऊ पाटील, संभाजी तुकाराम पाटील यांची पाच बंद घरे तर माळवी गल्लीतील प्रकाश साताप्पा माळवी, हरिजन वाड्यातील विजय दिनकर माने या पोलीस कर्मचाऱ्याचीही बंद घरे चोरट्यांनी फोडली. चोरट्यांनी दिवसा रेकी करून एका रात्रीत कटावणीच्या साह्याने कडी कोयंडे तोडत ही बंद घरे फोडली.

आशिष पाटील हे दोन दिवसांपुर्वी पत्नीसह मुंबईला कन्येकडे गेले आहेत, प्रकाश पाटील हे नोकरीनिमित्त कुटुंबासह यळगुड येथे, अभिजित चौगले यांचे कुटुंबीय कळंबा येथे, संभाजी पाटील कुटुंबीय पुणे येथे, प्रकाश माळवी आणी विजय माने कुटुंबीय कोल्हापुरात राहतात. सायंकाळी दोन तरुण ओला कंपनीच्या इलेक्ट्रिक दुचाकीवरून संशयास्पद टेहळणी करत मुख्य रस्त्यावरून फिरत असल्याचे काही ग्रामस्थांना आढळून आले होते.

विजय माने यांचे घर फोडताना शेजारच्या घरांच्या दारांना कड्या घालण्यात आल्या होत्या. त्यानंतर प्रकाश माळवी यांच्या घरात चोरी झाली. माळवी यांच्या घरातून चांदीचे दागिने, चांदीच्या मूर्ती, रेसर सायकल आणि रोख पंधरा हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले. ठाणटेक परिसरातील अमोल माळवी यांच्या घराबाहेरील हिरो होंडा पॅशन ही दुचाकीही चोरट्यांनी जाता-जाता लांबवली.

दुपारी राधानगरीचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीमसह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत संशयितांचा शोध सुरू केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT