कोल्हापूर : शाहू समूहाचे सर्वेसर्वा समरजित घाटगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर हात उंचावून उपस्थितांना अभिवादन केले. यावेळी शरद पवार यांच्यासह उपस्थित प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुहासिनी घाटगे, नंदाताई बाभुळकर, उत्तम जानकर, व्ही. बी. पाटील, आर. के. पोवार, ए. वाय. पाटील आदी.  Pudhari File Photo
कोल्हापूर

लाचारी पत्करणार्‍याला कागलची जनता धडा शिकवेल : शरद पवार

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कागलचा इतिहास लाचारीचा नाही, तर स्वाभिमानाचा आहे. लाचारी पत्करून जे संकट काळात सोडून गेले त्यांना या निवडणुकीत धडा शिकवा आणि समरजित घाटगे यांना ताकद द्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केले. शाहू सहकार समूहाचे सर्वेसर्वा समरजित घाटगे यांनी भाजपचा राजीनामा दिल्यानंतर मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्यात घाटगे यांच्या स्वागत सभेत पवार बोलत होते. कागलच्या गैबी चौकात हा कार्यक्रम झाला.

ज्यांना आम्ही ताकद दिली, प्रोत्साहन दिले, पाठिंबा दिला त्यांनी दुर्दैवाने वेगळी भूमिका घेतली. अनेक प्रसंगांत आम्ही त्यांच्या मागे राहिलो. संकटे येतात आणि जातात. संकट काळात साथ द्यायची असते. हे सोडून कोणाच्या तरी वळचणीला जाण्याची भूमिका घेतल्याचे मुश्रीफ यांचे नाव न घेता सांगून पवार म्हणाले, काहींच्या बाबतीत ‘ईडी’ आणि अन्य यंत्रणांनी कारवाई करण्याची भूमिका घेतली. या कारवाईचा त्रास कुटुंबातील मंडळींना झाला. तेव्हा कुटुंबातील भगिनींनी रस्त्यावर येत प्रसंगी आम्हाला गोळ्या घाला; पण त्रास देऊ नका, अशी भूमिका मांडली. तरीही कुटुंबालाही उघड्यावर सोडून बाहेर जाण्याची भूमिका त्यांनी घेतली. ठीक आहे. कागलची जनता कधीच लाचारीला स्वीकारणार नाही. कागलबरोबरच कोल्हापूर आणि महाराष्ट्रातील जनता अशा लाचारीला थारा देणार नाही, असे सांगून पवार म्हणाले, उद्याच्या काळात आपल्याला महाराष्ट्राची उभारणी करायची आहे, महाराष्ट्र आपल्या ताब्यात घ्यायचा आहे आणि स्वाभिमानाने पुन्हा महाराष्ट्र उभा करायचा आहे. यासाठी समरजित घाटगे यांना साथ द्या. तुम्ही त्यांना विधानसभेत पाठवा ते केवळ आमदार राहणार नाहीत, तर त्यांना संधी दिली जाईल, ते काम आमचे आहे, असेही पवार म्हणाले.

उद्योग, शेतीसह युवकांना उद्ध्वस्त करण्याचे काम

राज्यातील व देशातील उद्योग, शेतीसह युवकांना उद्ध्वस्त करण्याचे काम सुरू असून, पवार म्हणाले, साखरेची आणि इथेनॉलची निर्यात केली असती, तर शेतकर्‍यांना चार पैसे जास्त मिळाले असते. मात्र, केंद्राने निर्यातबंदी केली. युवकांना काम द्यायचे सोडून त्यांना उद्ध्वस्त करण्याचे काम सुरू आहे. पुण्यात हजारो तरुण रोजगाराच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले. येथील उत्पादनाला स्थान देण्याऐवजी आयात केली जाते, कंत्राटी पद्धत आणून रोजगार संपविण्याचा उद्योग सुरू असल्याचा घणाघात पवार यांनी केला.

दोषींना अटक करण्याची हिंमत सरकार का दाखवत नाही

बदलापूरला दोन चिमुरड्या मुलींवर अत्याचार झाले. त्यामुळे संतप्त लोक रस्त्यावर उतरले. रेल्वे बंद पाडली. मात्र, त्यातील आरोपींना पकडण्याऐवजी सरकार आंदोलन करणार्‍यांना पकडत आहे. आंदोलन करणार्‍यांचा दोष काय? त्यांनी आपला संताप आणि रोष व्यक्त केला. तोही करायचा नाही काय, असा सवाल करून पवार म्हणाले, शिंदे सरकारची आंदोलनकर्त्यांवर कारवाई करण्याची भूमिका चुकीची आहे. आंदोलनकर्त्यांवर कसली कारवाई करता. त्यांच्यावर खटले का दाखल करता. ज्यांच्यावर यात दोषारोप आहेत, त्यांना अटक करण्याची हिंमत सरकार का दाखवत नाही, असा सवालही त्यांनी केला.

वार्‍याने पुतळा पडला ही भूमिका केवळ वेडगळपणाची

शिवछत्रपतींच्या पुतळ्याच्या कामात सरकारने भ्रष्टाचार केल्याचा घणाघाती आरोप करून पवार म्हणाले, सागरी क्षेत्राचे संरक्षणाच्या द़ृष्टीने काय सामर्थ्य आहे. हे शिव छत्रपतींनी ओळखले होते. म्हणूनच सिंधुदुर्गसारखा किल्ला बांधला. सागरी सीमांचे रक्षण करण्याची भूमिका त्यांनी घेतली, याच ठिकाणी त्यांचा पुतळा उभारण्यात आला. मात्र, काही महिन्यांतच तो कोसळला. पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालेला पुतळा काही महिन्यांतच कोसळतो कसा, असा सवाल करून पवार म्हणाले, मुंबईत गेट वे ऑफ इंडियासमोर साठ वर्षांपासून समुद्राची हवा, वारे, वादळ झेलत शिव छत्रपतींचा पुतळा दिमाखाने उभा आहे. यशवंतराव चव्हाण यांनी या पुतळ्याची उभारणी केली. एका बाजूला हे उदाहरण असताना दुसर्‍या बाजूला समुद्राच्या वार्‍याने पुतळा पडला, अशी मांडली जाणारी भूमिका केवळ वेडगळपणाची आहे.

परिवर्तनाची गरज : घाटगे

समरजित घाटगे म्हणाले, विधानसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन घडवायचा मुहूर्त आज मिळाला. स्वर्गीय विक्रमसिंग घाटगे यांनी या मतदारसंघाला आपले कुटुंब म्हणून जोपासले होते. स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांनी 2009 सालामध्ये रेकॉर्ड केले होते तसेच रेकॉर्ड आता झाले आहे. तालुक्यातील जनतेमुळे शरद पवार कागलला आले. मानसन्मान केला हे तालुक्यातील जनतेमुळे शक्य झाले. कागलचा गैबी चौक म्हणजे, ओरिजिनल वस्ताद शरद पवार यांची जागा आहे, असे स्पष्ट करून ते म्हणाले, मतदारसंघाच्या भविष्यासाठी राष्ट्रवादी पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. लोकांना परिवर्तनाची गरज आहे. पूर्वी स्वर्गीय मंडलिक आणि स्वर्गीय राजे यांचा संघर्ष होता. तो संघर्ष प्रामाणिकपणे होता. मैत्रीदेखील प्रामाणिकपणे केली.

माझ्याकडे शरद पवार आणि कागलची जनता

मुश्रीफ यांचा नावाचा उल्लेख टाळून समरजित घाटगे म्हणाले, येथील मंत्री पाचवेळा मंत्री झाले आहेत. त्यांचा गट आहे, केंद्र आणि राज्याची सत्ता आहे, संस्थांच्या सत्ता आहेत. मात्र, माझ्याकडे शरदचंद्र पवार आणि जनता आहे. शरद पवारांची तुतारी गावागावांत वाजवून सुराज्य निर्माण करा, असे आवाहन करून शक्तिपीठ रद्द करण्याची मागणीही केली. आजरा, गडहिंग्लज तालुक्यांतील दोन्ही साखर कारखाने अडचणीत आले आहेत. त्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढावे.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची शेवटची सभा गैबी चौकातच व्हायला हवी. कारण, त्यांनी यापूर्वी शेवटच्या सभेत माझा गेम केला होता. आता केलेली चूक दुरुस्त करण्यासाठी शेवटची सभा गैबी चौकात घ्यावी, असे ते म्हणाले.

ते नतद्रष्ट निघाले : आ. जानकर

माढ्याचे आमदार उत्तमराव जानकर म्हणाले, कोल्हापुरी लढाऊ बाणा आहे. परिवर्तनाची भूमी आहे. मात्र, गेल्या दहा-बारा वर्षांपासून कोल्हापूरमध्ये अन्याय, अत्याचार सुरू आहे. शरद पवार यांनी समतेचे राजकारण केले, अनेकांना संधी दिली. येथील नेत्यांना काय काय दिले नाही. पवार यांनी संधी दिली. ‘गोकुळ’चे दूध प्यायला काजू, बदामाची पेंड खाल्ली. गांधीनगरमध्ये पाच मीटर कापडदेखील दिले, असे असताना ही ‘ईडी’ची चौकशी लागल्यानंतर कोटासह पळ काढला. ते नतद्रष्ट निघाले, अशा माणसांची अवस्था वाईट होणार आहे, अशी टीकाही त्यांनी मुश्रीफ यांचे नाव न घेता केली.

भ्रष्टाचारी नेतृत्वाला हाणून पाडा : व्ही. बी. पाटील

जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील म्हणाले, खोटे बोल, पण रेटून बोलणार्‍या कागल येथील नेत्याने वीस वर्षे भ्रष्टाचार करून वेठीला धरले. सर्वांशी गद्दारी करून शरद पवार यांनादेखील फसवले आहे. बहुजनांचे नेतृत्व संपवण्याचे काम केले आहे. जिल्हा बँकेमध्ये भ्रष्टाचार चालू आहे. भ्रष्टाचारातून कार्यकर्त्यांना दबावाखाली ठेवण्याचे काम केले. आम्हालादेखील शरद पवार यांच्यापासून दूर ठेवले, अशा भ्रष्टाचारी नेतृत्वाला हाणून पाडा, असे आवाहन केले.

स्वागत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष शिवानंद माळी यांनी केले; तर प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी केले. यावेळी बापूसाहेब शेटे, एकनाथ देशमुख, राजे बँकेचे माजी अध्यक्ष राजेंद्र जाधव, बाळासाहेब हेगडे, अभिजित कांबळे, रमीज मुजावर, सागर कोंडेकर यांची भाषणे झाली, तर माजी आमदार वीरकुमार पाटील, काकासाहेब पाटील, छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष सुहासिनीदेवी घाटगे, प्रवीणसिंह घाटगे, आमदार बाळासाहेब पाटील, वीरेंद्रसिंह घाटगे, नवोदिता घाटगे, श्रेयादेवी घाटगे, अश्विनी माने, पद्मजा तिवले, माजी नगराध्यक्ष माणिक माळी, ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष रणजित पाटील, नंदाताई बाभुळकर, ए. वाय. पाटील, राजे बँकेचे अध्यक्ष एम. पी. पाटील, रामराजे कुपेकर, अमरसिंह चव्हाण, रोहित पाटील, अनिल घाटगे, मुकुंद देसाई, वैभव शिंदे, अरुण व्हरांबळे, रमेश माळी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. आभार अमरसिंह घोरपडे यांनी मानले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT