कागल : कोल्हापूर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते व शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे हे भाजपला रामराम ठोकून मंगळवारी (दि. 3) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करत तुतारी हाती घेणार आहेत. कागल शहरातील गैबी चौकामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला पक्षाध्यक्ष शरद पवार प्रमुख उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून, शहरातील प्रमुख मार्गांवर ठिकठिकाणी स्वागत कमानी आणि स्वागताचे फलक उभारण्यात आले आहेत. दुपारी साडेचार वाजता हा जाहीर पक्ष प्रवेश होणार आहे.
दरम्यान, छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या मुख्य कार्यालयाला पवार भेट देणार असल्याचे समजते. यावेळी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील व इतर प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी घाटगे यांच्यासोबत कोल्हापूर जिल्ह्यातील तसेच कागल विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत.
या कार्यक्रमाला प्रवीणसिंह घाटगे, राष्ट्रवादी कोल्हापूर शहर अध्यक्ष आर. के. पोवार, महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी माने, महिला शहराध्यक्ष पद्मजा तिवले, कार्याध्यक्ष अनिल घाटगे, राष्ट्रवादी काँग्रेस कागल तालुका अध्यक्ष शिवानंद माळी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कागल तालुका महिला अध्यक्षा सौ. अश्विनी अरुण व्हरांबळे यांच्यासह अन्य प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर व आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खा. पवार यांची कागलमध्ये ही पहिली सभा होत असून, समरजित घाटगे यांच्या पक्ष प्रवेशाची उत्सुकता लागून राहिली आहे.